नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात देशी मद्यविक्री करणार्या संशयितांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात गुन्हे दाखल करून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. सोमवारी (दि.30) सकाळी 11 ते सायंकाळी सहा दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शिवा शांताराम वायकर (26, रा. सुभाषरोड) हा विहितगाव येथील शिवनगर परिसरात दुपारी एकच्या सुमारास देशी मद्यासह कारमधून जाताना मिळून आला. पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्याकडे 45 हजार 720 रुपयांचा मद्यसाठा आढळला. त्यामुळे संशयिताकडून कार व मद्य असा एकूण दोन लाख पाच हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. पंचवटी पोलिसांनी सकाळी 11च्या सुमारास तेलंगवाडी येथे कारवाई करीत तेथून राजू बाबूराव जाधव (45) व सायंकाळी सहाच्या सुमारास वाल्मीकनगर परिसरात कारवाई करून भरत कन्हैयालाल कासोदे (55) यांना अवैध मद्यसाठ्यासह पकडले. दोघांकडून सहा हजार 840 रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला आहे. अंबड पोलिसांनी राहुल नामदेव लहाडे (32, रा. चुंचाळे शिवार) याच्याकडून चार हजार 130 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे, तर दुसर्या कारवाईत विजय तुकाराम अवचार (30) याच्याकडून सात हजार 280 रुपयांचा मद्यसाठा व रोकड जप्त केली आहे.
मुंबई नाका पोलिसांनी भारतनगर येथील शिवाजीनगर परिसरात कारवाई करून रामदास रघुनाथ वारडे (55) याला 600 रुपयांच्या देशी मद्यासह पकडले, तर गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात कारवाई करून बंडू गंगाराम पारवे (50) या संशयिताकडून एक हजार 110 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. हे संशयित मद्यविक्री व साठा करताना आढळून आले होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.