दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना 9 जूनपर्यंत कोठडी | पुढारी

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना 9 जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : मनी लाँडरिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 9 जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली. सुनावणीदरम्यान ‘ईडी’कडून जैन यांना 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. कोठडीदरम्यान जैन यांना घरचे जेवण देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत; परंतु दररोज मंदिरात जाऊ देण्याची जैन यांच्याकडून केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली.

2015 ते 2017 दरम्यान सीबीआय आणि आयकर विभागांद्वारे 4.81 कोटी रुपयांच्या उत्पन्नाहून अधिक संपत्ती तसेच हवालाच्या माध्यमातून पैसा गोळा केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी जैन यांना कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. जैन यांच्याकडून चौकशीदरम्यान कुठल्याची प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नसल्याने तसेच हवालामार्फत आलेला पैसा जैन यांचा होता की दुसर्‍याचा, याचा तपास करायचा असल्याने ‘ईडी’कडून कोठडीची मागणी करण्यात आली होती.

केजरीवाल यांची भाजपवर टीका

जैन यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मी व्यक्तिगतरीत्या या अटक प्रकरणाचा अभ्यास केला आहे. ही पूर्णपणे भाजप करत असलेली फसवणूक आहे. आम्ही स्वतः भ्रष्टाचार करत नाही आणि इतरांनी केलेला भ्रष्टाचार सहनही करत नाही. आमच्याकडे प्रामाणिक सरकार आहे. जैन यांना राजकीय कारणामुळे निशाणा बनवले आहे. तेे निर्दोष आहेत. आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे, असे केजरीवाल म्हणाले.

Back to top button