‘हा’ आहे जगातील सर्वात उंच वृक्ष, जाणून घ्या अधिक | पुढारी

'हा' आहे जगातील सर्वात उंच वृक्ष, जाणून घ्या अधिक

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये जगातील सर्वात उंच वृक्ष आढळतात. त्यांना ‘कोस्ट रेडवूडस्’ (सेक्युआ सेम्पेरव्हायरेन्स) असे नाव आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील किनारपट्टीजवळ असलेल्या रेडवूड नॅशनल पार्कमध्ये हे वृक्ष मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये ‘हायपेरियन’ नावाच्या वृक्षाला या उंच वृक्षांचा राजा असेच म्हटले जाते. त्याची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आलेली आहे.

या हायपेरियन वृक्षाची उंची तब्बल 380 फूट, 9.7 इंच इतकी आहे. एखाद्या 35 मजली इमारतीपेक्षाही अधिक उंचीचा हा वृक्षराज आहे. हा वृक्ष नेमका कुठे आहे याची माहिती गुप्तच ठेवण्यात आली आहे. तो सुमारे 600 ते 800 वर्षे जुना असल्याचे मानले जाते. 2006 मध्ये या वृक्षाचा सर्वप्रथमच शोध घेण्यात आला. ख्रिस अ‍ॅटकिन्स व मायकल टेलर या संशोधकांनी कॅलिफोर्नियाच्या जंगलात या वृक्षाचा शोध लावला. एका डोंगराच्या पायथ्याशी हे वृक्ष असल्याने वेगवान वार्‍यापासून त्यांचे संरक्षण होत असते. उंच असल्याने त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत असतो. हे वृक्ष जगातील केवळ सर्वात उंच वृक्ष नसून ते पृथ्वीवरील सर्वात जुन्या वृक्षांपैकीही आहेत. ते तब्बल 2 हजार वर्षेही जगू शकतात. ते इतके दीर्घायुष्यी का असतात याचीही नेमकी माहिती नाही. त्यामागे स्थानिक वातावरणाचीही एक भूमिका असू शकते.

Back to top button