नाशिक : फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन महिलांना ४२ लाख रुपयांचा गंडा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेतून स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने दोन महिलांकडून ४२ लाख ६३ हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात संशयित युवराज भोसले उर्फ सतीश उर्फ विरेंद्रसिंह बाळासाहेब कोल्हे याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
उत्तरा बाबूलाल कुमावत ( रा . खोडदेनगर, उपनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित युवराज भोसले याने नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत गंडा घातला. संशयित युवराजने वेगवेगळी नावे सांगून उत्तरा यांच्याशी ओळख केली. आपल्या बहिणीचे पैठणी साड्यांचे शोरूम असल्याचे भासवून पैठणी साडी शूटिंग करण्याच्या बहाण्याने उत्तरा यांच्याशी ओळख वाढवली. उत्तरा यांचा विश्वास संपादन करून मंत्रालयातील मित्राच्या ओळखीने उत्तरा यांना गंगापूर रोडवर १८ लाखांत व त्यांच्या नातलग कविता परदेशी यांना १६ लाखांत फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष युवराजने दाखवले.
त्यानुसार युवराजने उत्तरा यांच्याकडून १६ लाख ८ ९ हजार ६०० रुपयांसह साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व आयफोन प्रो – मॅक्स असे एकूण २१ लाख ४५ हजार १०० रुपये घेतले, तर परदेशी यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने २१ लाख १८ हजार रुपये घेतले. त्यानंतर उत्तरा यांनी फ्लॅटबाबत विचारपूस केली असता, युवराजने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तरा यांनी उपनगर पोलिसांकडे धाव घेत फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :

