

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एटीएम कार्ड कोल्हापुरात होते…. पण खात्यातून अचानक पैसे गेल्याचे मॅसेज मोबाईलमध्ये धडकले… काही कळण्याच्या आत दिल्लीतील एटीएम सेंटरमधून २ लाख रुपये काढल्याचे समोर आले.
कोल्हापुरातील एका ट्रेडिंग व्यावसायिकाच्या चालू खात्यातील ही रक्कम एका रात्री अचानक गायब झाली. एटीएम कार्ड क्लोन करुन हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. (ATM Cloning)
मोरेवाडी येथे राहणार्या एका ट्रेडींग व्यावसायिकाच्या चालू खात्यातील २ लाखांची रक्कम मध्यरात्री पावणे बारा ते पहाटे सव्वा पाचच्या कालावधीत गायब झाली. एटीएम कार्ड संबधिताजवळच होते.
पण दिल्लीतील उत्तमनगर येथील एटीएममधून एका पाठोपाठ रक्कम निघाल्याचे मॅसेज दुसर्या दिवशी मिळाले. या घटनेने हा व्यावसायिक हडबडून गेला. खात्यातील तब्बल दोन लाख नेमके गेले कोठे, कसे, कोणाकडे हे समजेनासे झाले.
एटीएम कार्ड कोठेही वापरले नसताना अचानकपणे खात्यातील रक्कम जाण्याचे व्यावसायिक भांबावला आहे. या गोंधळात त्याने बँकेसह सर्वत्र फेर्या मारल्या. यानंतर तो पोलिसांकडे आला असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.
तुम्ही जे एटीएम कार्ड वापरता त्याचे डुप्लिकेट कार्डमध्ये रुपांतर करण्याला क्लोनिंग म्हणतात. एटीएम सेंटरमध्ये गुप्त कॅमेरे लावून तुमच्या कार्डची माहिती चोरली जाते. यानंतर दुसर्या एटीएममध्ये ती अपलोड करुन तुमचे मूळ कार्ड बंद पाडले जाते. यानंतर डुप्लिकेट कार्डद्वारे व्यवहार करुन तुमच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारला जातो.
एटीएम सेंटरमध्ये कार्डचा वापर करताना तुमच्या गोपनीय ओटीपी कोणाला दिसणार नाही असा वापरणे, अनोखळी व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये असताना त्याच्यासमोर व्यवहार सुरु ठेवणे टाळावे, एटीएम मशीनवर कोणताही गुप्त कॅमेरा, डिव्हाईस लावण्यात आले नाहीत ना याची खातरजमा करावी, आपले कार्ड दुसर्याला हाताळण्यास देणे टाळावे अशी सतर्कता घेतल्यास आपल्याला कार्ड क्लोनिंगसारखा प्रकार टाळता येते शक्य होईल.