नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भुजबळ फार्म निवासस्थानासमोर आंदोलन करत सरस्वती पूजन करण्यात आले. वादग्रस्त विधानानंतर भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजयुमोने निवासस्थानी जात भुजबळांविरुद्ध घोषणाबाजी केली.
दरम्यान, भाजयुमोच्या आंदोलनामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. वक्तव्याचा निषेध म्हणून भुजबळांना सरस्वतीची प्रतिमा भेट देण्यात येणार होती. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना निवासस्थानात जाण्यास मज्जाव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भुजबळ यांनी 'शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे छायाचित्र लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वती व शारदामातेचे छायाचित्र लावले जाते जिला आम्ही कधी पाहिले नाही. जिने आम्हाला काही शिकवले नाही शिकवले असेल तर फक्त तीन टक्के लोकांनाच शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले, तर त्यांची पूजा कशासाठी करायची, असे वादग्रस्त विधान भुजबळ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून नाशिक पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजयुमो कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध करत भुजबळ फार्म येथे त्यांना सरस्वती मातेची प्रतिमा तसेच सावित्रीबाई फुले यांनी सरस्वतीवर लिहिलेला काव्यसंग्रह भेट देण्याचा बेत आखला. मात्र, भुजबळ उपस्थित नसल्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेरच कार्यकर्त्यांनी सरस्वतीची आरती म्हटली. भुजबळांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवाळला. याप्रसंगी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनछोडे, राहुल कुलकर्णी, ऋषिकेश आहेर, धनंजय पुजारी, डॉ. वैभव महाले, संदीप शिरोळे, साक्षी दिंडोरकर, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, विनोद येवले, भाविक तोरवणे, विकी पाटील, मुफद्दल पेंटर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.