यंदा रब्बीचे क्षेत्र 25 टक्के वाढणार ! कृषी विभागाची तयारी | पुढारी

यंदा रब्बीचे क्षेत्र 25 टक्के वाढणार ! कृषी विभागाची तयारी

नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदा चांगला पाऊस झाल्याने छोटी-मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली. ओढे, नाले वाहते झाले, त्यामुळे विहिरी, बोअरवेल्सचाही पाणीसाठा समाधानकारक आहे. रब्बीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पेरणीच्या सरासरी क्षेत्रातही 25 टक्के वाढ होऊ शकते. यात ज्वारीचे क्षेत्र यावर्षीही घटणार असून, गहू, हरभरा, कांदा पिकांखालील क्षेत्रात मात्र विक्रमी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे 4 लाख 58 हजार 636 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका इत्यादी रब्बी तृणधान्य हे 3 लाख 68 हजार 513 हेक्टर आहे. हरभरा व अन्य असे कडधान्याखाली 89 हजार 637 हेक्टर क्षेत्राची सरासरी आहे. त्यामुळे कडधान्याखाली 4 लाख 58 हजार 150 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे कृषी विभागच्या आकडेवारीनुसार दिसते. याशिवाय करडई, मोहरी, तीळ, जवस, सूर्यफूल, याखालीही 486 हेक्टर लागवड होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात 4 लाख 58 हजार 636 हेक्टरवर पिक पेरणी होईल, असा तर्क आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र दरवर्षी घटताना दिसत आहे. यावर्षीही वापसा नसल्याने ज्वारीचे क्षेत्र घटणार आहे. या उलट गहू, हरभरा इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. साधारणतः 27 सप्टेंबरनंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन हरभरा पेरणीसाठी पोषण वातावरण तयार होणार आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये गहू पेरणीला खर्‍याअर्थाने वेग येणार आहे. खरीप कांदाही कमी होता. त्यामुळे रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढू शकते.

सध्या अनेक शेतकर्‍यांनी कपाशी लागवड केलेली आहे. कपाशीखाली तब्बल 1 लाख 11 हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत तीन वेचण्या झाल्यानंतर गव्हासाठी रानं मोकळ करण्याचे शेतकर्‍यांचे नियोजन आहे. त्यावेळी गहू पेरणीला उशीर होणार असला तरी वातावरण पोषण राहील, या अपेक्षेने शेतकरी गहू पेरणी करू शकणार आहे.

 

पाऊस चांगला झालेला असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यात, ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तर गहू, हरभरा आणि कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. शेतकर्‍यांना शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने रब्बी सरासरी ओलांडेल.
                                              – शिवाजीराव जगताप,  जिल्हा कृषी अधीक्षक

Back to top button