येरवडा; पुढारी वृत्तसेवा: खराडी, वडगाव शेरी परिसरातील चौदांहून अधिक रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्याचा परिणाम परिसरातील बहुतांश रस्त्यावर 'पिकअवर्स'मध्ये वाहतूक कोंडीचे चित्र नित्याचे बनले आहे. या अर्धवट कामामुळे रोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
खराडी व वडगाव शेरीमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात सध्या अस्तित्वात असलेले रस्ते हे अपुरे पडत आहेत, खराडी व वडगाव शेरी परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेले रस्ते तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, असे निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी आमदार बापू पठारे यांनी आयुक्तांना दिले आहे. या वेळी निवदेनात त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला आहे.
रखडलेले रस्ते
मुंढवा पूल ते रेल्वे पूल 80 फुटी रस्त्याचे रुंदीकरण बर्याच दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे येथे नियमित वाहतूक कोंडी होते.
खराडी-शिवणे रोड हा नदी किनार्याचा रस्ता काही स्थानिक नागरिकांकडून अडवण्यात आला आहे. हा रस्ता तत्काळ पूर्ण करण्यात यावा. स. नं. 20 / 4 मध्ये सुशीलकुमार मिश्रा व अमित बन्सल, विकास जर्हाड, प्रसाद पठारे, स्वप्नील पठारे यांच्या मिळकती ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
स. नं. 69 खराडी येथील नदीवरील पूल व रस्ता अर्धवटच राहिला आहे.
स. नं. 14 व 16 च्या हद्दीवरील 50 फूट डीपी रोड ताब्यात घेऊन थिटेनगर भागातील रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे.
सातव वस्तीतून जाणारा 125 मी डी. पी. रस्ता अर्धवट राहिलेला आहे.
100 फुटी डी. पी. रस्ता ते स. नं. 67, 68 मधील तीस मीटर रस्ताही पूर्ण झालेला नाही.
राजाराम पाटीलनगर स. नं. 59, 60, 62, 63 डी. पी. च्या हद्दीवरील रस्ता प्रलंबित राहिला आहे.
रक्षकनगर गोल्ड श्री हॉस्पिटलपासून 12 मी. वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे जाणारा डी. पी. रस्ता याशिवाय इतरही अनेक रस्त्यांची कामे लांबली आहेत.
खराडी ते शिवणे नदीपात्रातील रस्ता अद्याप रखडलेलाच
खराडी-शिवणे हा नदीपात्रातील रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. जागा ताब्यात नसणे, न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे विकास आरखड्यातील रस्त्याचे काम थांबले आहे. खराडीपासून ते येरवड्यापर्यंत जरी नदीपात्रातील रस्ता पूर्ण झाला, तर नगर रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.