लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा महिन्यापासून ऐन पावसाळ्यात बंद असल्याने पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची लासलगाव शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मालेगाव येथे भेट घेत कैफियत मांडली. त्यावेळी ना. भुसे यांनी लासलगावचा पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासित केले.
लासलगाव हे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात येते. भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पाइपलाइनसाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहे. मात्र अजून या कामास सुरुवात न झाल्याने लासलगावमधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी प्रकाश पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले असता, तत्काळ आ. छगन भुजबळ यांनी अधिकार्यांसमवेत लासलगाव ग्रामपंचायत येथे बैठक घेतली होती. परंतु महिना उलटूनदेखील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वंचित आहेत. ऐन पावसाळ्यातदेखील लासलगाव-विंचूरसह पाणीपुरवठा योजनेचे लाभार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत. नागरिक तहानलेलेच आहेत. दरम्यान, ना. भुसे यांनी सबंधित अधिकार्यांना ही पाइपलाइन तत्काळ दुरुस्ती करून ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या नवीन पाइपलाइनसाठी वीस कोटी रुपये मंजूर असून याबाबतही पालकमंत्री भुसे यांनी अधिकार्यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या. शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे, कांदा व्यापारी प्रवीण कदम, विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष भय्या नाईक उपस्थित होते.