नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याला अवकाळी व गारपीट तसेच वादळी पावसाने जोरदार फटका दिला आहे. मालेगाव तालुकाही याला अपवाद ठरलेला नाही. मार्च आणि एप्रिल 2023 या महिन्यांत दोन टप्प्यांत कोसळलेल्या अवकाळी संकटात तब्बल 915.5 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. याशिवाय घरांचे आणि पोल्ट्रीफार्मचे झालेले नुकसान वेगळे. शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचीही जीवितहानी झाली आहे.
तालुक्यात 8 मार्चला वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला होता. तेव्हा तब्बल 23 गावांना प्रामुख्याने फटका बसला. 1,210 शेतकरी बाधित होऊन 666 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकारी बी. जी. व्यवहारे यांनी दिला आहे. कांदापाठोपाठ (210 हेक्टर), मका (160 हेक्टर), गहू (110 हेक्टर), डाळिंब (110 हेक्टर) या पिकांची अतोनात हानी झाली. भाजीपाला, कलिंगड, हरभरा आणि लिंबू उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. पांढरूण, आघार, तळवाडे, दुंधे, वळवाडे, कजवाडे, मेहुणे, साकुरी, मळगाव, चौकटपाडे, डोंगराळे,भारदेनगर, पिंपळगाव, दाभाडी, ढवळेश्वर, रावळगाव, सातमाने, जाटपाडे, पाथर्डे, वडनेर, कोठरे बुद्रूक आणि कोटबेल या गावांमधील ही परिस्थिती होती. त्याला महिना उलटत नाही तोच पुन्हा अवकाळी आणि गारपिटीने 12 गावांत थैमान घातले. 15 एप्रिलला वडवाडे, लुल्ले, कुकाणे, कंक्राळे, मोरदर, टिपे, निमशेवडी, गारेगाव, कजवाडे, करंजगव्हाण, पोहाणे या शेतशिवारातील 249.50 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले. यावेळीही कांद्याचे सर्वाधिक (220 हेक्टर) नुकसान झाले. कांदा डोंगळे (17.50 हेक्टर), कलिंगड (3 हेक्टर) आणि डाळिंबाची (5 हेक्टर) हानी झाली आहे. 256 बाधित शेतकर्यांचा हा प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे.
मार्चमध्ये 666 हेक्टर आणि 15 एप्रिलला 249 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आठ जनावरेही दगावली असून, घरांचे आणि पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे. सुटीच्या दिवशीही यंत्रणेने स्थळपंचनामे केले असून, त्यानुसार वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्यात आला आहे. – नितीनकुमार देवरे, तहसीलदार.