नगर : जिल्हा सहकारी बँकेकडून पशुपालन कर्जमर्यादेत वाढ : शिवाजी कर्डिले | पुढारी

नगर : जिल्हा सहकारी बँकेकडून पशुपालन कर्जमर्यादेत वाढ : शिवाजी कर्डिले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संकरित गायी, म्हैस पशुपालन खेळते भांडवल कर्ज प्रति युनिट 15 हजारवरून आता 20 हजार रूपये करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक कर्जदार सभासदास आता दोनऐवजी चार दुभती जनावरे खरेदी करता येणार असून, त्यासाठी कर्ज मर्यादा प्रती जनावर 60 हजारवरून 75 हजार रूपये इतकी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले व व्हाईस चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांना सेवा सोसायट्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकर्‍यांच्या विकासाचे दृष्टीने जिल्हा बँक नेहमीच शेतकरीभिमुख निर्णय घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सन 2022-23 वर्षातील पशुपालन खेळते भांडवल कर्जदार सभासदांसाठी सन 2023-24 सालासाठी संकरित गायी, म्हैस पशुपालन खेळते भांडवल कर्ज प्रति युनिटसाठी 15 हजारांवरून 20 हजार रूपये करण्यात आले आहे. सदर कर्ज सभासदास 7 टक्के दराने या सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार असल्याची माहिती चेअरमन कर्डिले यांनी दिली. त्याचप्रमाणे आता कर्जदार सभासदांना दोनऐवजी चार दुभती जनावरे खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता प्रती जनावरासाठी 60 हजारांऐवजी 75 हजार रूपये कर्ज मिळणार आहे.

दुग्धव्यवसायाद्वारे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठी प्रगती केलेली असून, शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झालेला आहे. त्याअनुषंगाने शेतकर्‍यांचे हिताच्या दृष्टीने व बाजारभावाचा विचार करून कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती चेअरमन कर्डिले यांनी दिली. जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखा व सेवा संस्थांना परिपत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी बँकेची शाखा किंवा सेवा संस्थांशी संपर्क साधून वेळेत कर्ज उपलब्ध करून घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन कर्डिले यांनी केले आहे.

 

Back to top button