

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार मध्ये गावठी पिस्टल सह जिवंत काडतुस बाळगताना आढळला म्हणून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीताला अटक करून गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरीक्षक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. तसेच नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. यादरम्यान नंदुरबार मध्ये गावठी पिस्टल जिवंत काडतुस एकाजवळ सापडले.
अनुषंगाने दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे गावठी कट्टा कब्जात बाळगून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच शहादा पोलिस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर जावुन संशयीत इसमाचा शोध घेतला असता एका बंद कोल्ड्रींक्सच्या दुकानासमोर एक अल्पवयीन आढळला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली, त्याच्याकडे 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक पिवळ्या धातुचे जिवंत काडतूस सापडले. त्याच्याविरुध्द शहादा पोलिस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.