

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
प्रवासी रिक्षाचे आयुर्मान संपल्यानंतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत १७ मुदतबाह्य रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासनाने प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्या नियमांनुसार वाहन वापरात आणणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही मुदतबाह्य रिक्षा सातत्याने रस्त्यावर फिरत असून, यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. अशा प्रकारची प्रवासी वाहतूक धोकादायक आहे. त्यामुळे मुदतबाह्य रिक्षांवर कारवाई करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने संयुक्त तोपासणी मोहीम हाती घेतली आहे. शालिमार तसेच रविवार कारंजा भागात आरटीओचे पथक नेमून रिक्षा तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत जवळपास ४० रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ वाहनांना ज्ञापने देण्यात आली, तर १७ रिक्षा जप्त करून त्या पेठ रोडवरील राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यशाळेत जमा करण्यात आल्या आहेत.
मोटार वाहन निरीक्षक अतुल सूर्यवंशी, सहायक निरीक्षक मंगेश दिघे, प्राची मोडक, प्रमोद अरगडे, विजय चौधरी, वाहतूक पोलिस निरीक्षक सुधीर डोंबरे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेळके आदींनी कारवाईत सहभाग घेतला.