Shraddha murder case | श्रद्धा हत्या प्रकरण : जंगलात सुटकेसमध्ये आढळले शरीराचे अवयव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha murder case) महत्वाची माहिती समोर आली आहे. सूरजकुंड येथील जंगल परिसरात एका सुटकेसमध्ये शरीराचे अवयव सापडले आहेत. या घटनेची माहिती फरीदाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून दिली आहे. हे अवयव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाणार आहेत. दिल्ली पोलिसांना याची डीएनए चाचणी करायची असल्यास नमुने बाजूला ठेवले जातील, असे फरिदाबाद पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाती आरोपी आफताबने त्याच्या पॉलिग्राफ चाचणीदरम्यान पोलिसांसमोर कबूल केले की त्याने बॉलिवूड चित्रपट ‘दृश्यम’चा पहिला भाग पाहिला होता.
श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताब पूनावालाने वापरलेले पाच धारदार चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या कामासाठी वापरलेली करवत अद्याप सापडलेली नाही. श्रद्धा खून प्रकरणातील एकेक पुरावे गोळा करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत असली, तरी रोज काही ना काही नवीन हाती लागत आहे.
गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, आफताबने गळा दाबून मारल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी विविध प्रकारचे धारदार चाकू वापरले. शिवाय, इलेक्ट्रिक कटर किंवा करवतही वापरली असावी, असा संशय आहे. आफताब शेफ असल्याने त्याला चाकूबाबत पूर्ण माहिती होती. आतापर्यंत पाच ते सहा इंच पाते असलेले पाच चाकू पोलिसांच्या हाती लागले आहेत. ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, आफताब पूनावाला याची आज पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. रोहिणी येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही चाचणी करण्यात आली. (Shraddha murder case)
आफताबने पाहिला होता दृश्यम-१
आफताबने त्याच्या पॉलिग्राफ चाचणीदरम्यान पोलिसांसमोर कबूल केले की त्याने बॉलिवूड चित्रपट ‘दृश्यम’चा पहिला भाग पाहिला होता, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
आफताब श्रद्धाच्या पाठीवर देत होता सिगारेटचे चटके
आफताब पूनावाला श्रद्धा वालकरला सिगारेटचे चटके देत असे. पण त्याला आणखी एक संधी द्यायची तिने ठरवल्याने पोलिसांकडे जाण्याचे टाळले, असा आरोप तिच्या एका मित्राने गुरुवारी केला होता. आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर श्रद्धा तिच्या कुटुंबाच्या आणि तिच्या सर्व मित्रांच्या संपर्कात अधिक राहिली नाही, असे तिचा कॉलेज मित्र रजत शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. “२०२१ मध्ये श्रद्धाने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत शेअर केले होते की आफताब तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके देत होता आणि हे ऐकून आम्हाला वाईट वाटले,” असेही त्याने सांगितले. त्यानंतर तिच्या मित्रांनी आफताबची भेट घेतली आणि तिच्याशी गैरवर्तन केल्यास पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली, असे शुक्ला यांनी सांगितले. तो पुढे म्हणाला, की श्रद्धानेच आम्हाला त्याला आणखी एक संधी देऊन बघू असे समजावले आणि त्यामुळे तिचा जीव गेला.”
Shraddha murder case | Faridabad Police contacted Delhi Police after a suitcase with body parts inside was found in a forest area in Surajkund yesterday. It’ll be sent for postmortem. Faridabad Police say samples will be kept aside, in case Delhi Police want to go for a DNA test.
— ANI (@ANI) November 25, 2022
हे ही वाचा :
- Shraddha Murder Case : आफताबने दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाला दिली होती तुकडे करण्याची धमकी
- श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले पाच चाकू जप्त