पिंपरी : पालिका, क्षेत्रीय कार्यालयात सुविधांची वानवा | पुढारी

पिंपरी : पालिका, क्षेत्रीय कार्यालयात सुविधांची वानवा

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, पालिका भवन व सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात बाकेच नाहीत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या दालनाबाहेर नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. तसेच, पिण्याच्या पाण्याची सुविधेची वानवा आहे. पार्किंगला जागा मिळत नसल्याने रस्त्यावर वाहने लावावी लागतात.

खुर्च्यांची संख्या अपुरी

पिंपरीत पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत पालिका भवन आहे. पालिकेसंदर्भातील कामांसाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक व पदाधिकारी, ठेकेदार, सल्लागार असे दररोज शेकडो जण पालिकेत ये-जा करतात. अधिकारी व्यस्त असल्यास नागरिकांना दालनाबाहेर थांबून प्रतीक्षा करावी लागते. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व प्रमुख अधिकारी सोडल्यास इतर ठिकाणी मात्र, नागरिकांना बसण्यासाठी बाकेच नाहीत. उपलब्ध असलेल्या बाके व खुर्च्यांची संख्या अपुरी आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही

तसेच, तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याची व्यवस्था चांगली नाही. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी ग्लास नसल्याने नागरिकांना पाणी पिता येत नाही. तळमजल्यावरील स्वच्छतागृहाचा अधिक वापर होत असल्याने तेथे अस्वच्छता व दुर्गंधी कायम असते. स्वच्छतागृहाची रचना जुनाट असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात. पालिकेच्या आवारात जागा मिळत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने लावावी लागतात. पालिका आवारातील कँटीनमध्ये सतत गर्दी असते. दिवसभर जेवण मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.

क्षेत्रीय कार्यालयातही गैरसोयी

क्षेत्रीय कार्यालयातही नागरिकांना बसण्यासाठी बाके नाहीत. तसेच, पायर्‍या व आवारात विविध साहित्य व सामान ठेवले जात असल्याने कार्यालय विद्रुप दिसते. लिफ्टची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. अधिकारी बदलेले तरी, अनेक कार्यालयात जुन्याच अधिकार्‍यांच्या नावाच्या पाट्या कायम आहेत. स्वच्छतागृहांची रचना जुनाट असून, ती व्यवस्था सुमार दर्जाची आहे. अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण कारवाई पथकांची वाहने, जप्त केलेल्या साहित्यांच्या ढीग आदींच्या गर्दीमुळे नागरिकांना वाहने लावण्यास जागा मिळत नाही. नाईलाजास्तव वाहने रस्त्यावर लावली लागतात. नागरिकांना सौजन्याने वागणूक दिली जात नसल्याचे चित्र आहे. महापालिका भवनाप्रमाणे तेथे प्रवेश करणार्‍या नागरिकांची तपासणी व चौकशी केली जात नाही. त्यामुळे कार्यालयात कोणीही ये-जा करताना दृष्टीस पडतात.

दालनात अधिकारी, कर्मचारी नसताना दिवे, पंखे सुरूच

पालिका भवनात तसेच, क्षेत्रीय कार्यालयातील दालनात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतानाही सर्व दिवे, पंखे सुरूच ठेवले जातात. तसेच, पॅसेजमध्येही पंखे सतत सुरू असतात. त्यामुळे नाहक
विजेचा अपव्यय होतो.

अधिकार्‍यांच्या दालनातील तुटलेले बाके

अधिकार्‍यांच्या दालनातील तुटलेले बाके व खुर्च्या काही ठिकाणी नागरिकांसाठी ठेवण्यात आले आहेत. नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांना अधिकार्‍यांच्या दालनाबाहेर तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते. चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या दालनाबाहेर व्हीआयपी पाहुण्यांसाठी वातानुकुलित यंत्रणेसह प्रतीक्षा कक्ष आहे. भेटणास येणार्‍यांमध्ये या प्रकारे भेदभाव केला जात असल्याबद्दल काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button