नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दसरा-दिवाळीनंतर सोन्याचे दर महागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने, लग्नसराईसाठी आतापासूनच सोने-चांदी खरेदीसाठी वधू आणि वर पित्याकडून गर्दी केली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाच्या एकापाठोपाठ तिथी आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी आतापासूनच करण्यावर भर दिला जात असल्याने, सध्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 2022 या वर्षात चातुर्मासामुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तीन महिने सोडल्यास सर्वच महिन्यांमध्ये विवाहाच्या भरपूर तिथी होत्या. वर्षभरात सुमारे 89 विवाहांचे मुहूर्त होते. तर पुढील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत विवाहाचे तब्बल 11 मुहूर्त आहेत.
दरम्यान, विवाहात सोन्याच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून, ते खरेदी करण्यासाठी सध्या दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. त्यातच दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढतील, असा अंदाज वर्तविला जात असल्याने, सध्या वधू-वरांकडील मंडळी सराफ बाजारात सोने खरेदी करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढउतार बघितल्यास सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. त्यातच अलीकडील काही दिवसांमध्ये सोने स्वस्त झाल्यानेदेखील खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान, गुरुवारी सोन्याच्या दरात 716 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर चांदी 140 रुपयांनी स्वस्त झाली. परंतु दरातील ही चढउतार सामान्य असून, पुढच्या काही दिवसांमध्ये सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, दिवाळीनंतर सोन्याच्या किमतींचा भडका उडण्याचीही शक्यता असल्याने, सोने-चांदी खरेदीची हीच योग्य वेळ असल्याचेही व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
वधू-वरांकडील मंडळींमध्ये उत्साह
कोरोना काळातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांत अत्यंत साध्या पद्धतीने लग्नकार्य उरकण्यात आले. यंदा मात्र, अत्यंत उत्साहात लग्नाचा बार उडवून दिला जाणार आहे. त्यातच ज्योतिषशास्त्रानुसार 2022 हे वर्षे अनेक अर्थांनी लाभदायक असणार आहे. या वर्षात एकाच महिन्यात सर्व ग्रह रास बदलणार आहेत, तर चातुर्मास वगळता या वर्षात विवाहाचे अनेक मुहूर्त असणार आहेत. त्यामुळे यंदाचे कार्य हे शुभ ठरणार असल्याने वधू-वरांकडील मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
विवाहाच्या तारखा अशा
नोव्हेंबर 2022
25, 26, 28, 29
डिसेंबर 2022
1, 2, 4, 7, 8, 9, 14