संगमनेर : पुढारी वृत्तसेवा: समन्यायी पाणी वाटपाबाबत सातत्याने काही मंडळींनी वीष पेरण्याचे काम केले, अशी टीका करीत ज्यावेळी संगमनेर- अकोले हे दोन्ही तालुके समन्यायी पाणी वाटपाविरोधात आंदोलन करीत संघर्ष करीत होते, तेव्हा 'या' मंडळींनी त्या संघर्षात कुठलाच सहभाग घेतला नाही, असे सांगत 'ते' विधीमंडळात असतानासुद्धा काहीच न बोलता तुम्ही गप्प का बसले, असा सवाल माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान, सत्ता येते अन् जाते, पण तुम्ही तालुक्यात जे दबावाचे राजकारण सुरू केले आहे, ते संगमनेरकर जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे नाव न घेता त्यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शेतकरी मेळाव्यामध्ये आ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखाना चेअरमन प्रतापराव ओहोळ, महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, शेतकी संघ चेअरमन संपतराव डोंगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, सन 1999 सालात पाटबंधारे राज्य मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या, मात्र यावेळी मंत्री मधुकरराव पिचड यांचेच मोलाचे सहकार्य मिळाले, मात्र 'निळवंडे'चे श्रेय घेऊ पाहणार्यांचे यात योगदान नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरणासह कालव्यांसाठी अविरत प्रयत्न केल्यामुळे कालव्यांची कामे अंतिम टप्प्यामध्ये आली. त्यामुळे आता निळवंडेचे पाणी कोणीही थांबू शकणार नाही, असे सांगत ते म्हणाले, निळवंडेसाठी ज्यांनी मदत केली असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा आम्ही कायम उल्लेख करत राहू, मात्र निळवंडेसाठी तुमचे योगदान काय, असा सवाल त्यांना केला. आ. डॉ. तांबे म्हणाले, निळवंडे धरण पूर्ण करून कालव्यांसाठी आ. थोरात यांनी पद पणाला लावले. यावेळी महेंद्र गोडगेंचे भाषण झाले.
राहुल गांधींच्या यात्रेमुळे बदलाचे वारे..!
आपल्याला पद मिळाले त्याप्रमाणे वागा. पदाची किंमत ठेवा. निळवंडे कालव्यांसह गेल्यावर्षी कोरोना संकटातही पाणी पुरवठा योजनेसाठी 883 कोटी रुपयांचा निधी मिळविला. विविध रस्ते व विकास कामांना निधी मिळविला, मात्र नवे सरकार आले अन् सर्व कामांना स्थगिती दिली. त्यामुळे हे स्थगिती सरकार आहे, अशी टीका करुन, देशात बदलाचे वारे निर्माण झाले आहे. खा. गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पुढील निवडणुकीत देशासह राज्यात बदल होणार असल्याचे काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.