

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध पक्षांतील अनेक दिग्गज उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना, अश्रू, नाराजी आणि नेतृत्वाविरोधातील सवाल यामुळे हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेला ठरला.
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सर्व पक्षांकडून मिळून एकूण १०३८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे थेट कैफियत मांडली, तर काहींनी बैठकीच्या ठिकाणी जाऊन “आम्हाला तिकीट का नाही?”, “नुकतेच पक्षात आलेल्यांना तिकीट का दिले?” असे सवाल उपस्थित केले.
निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय दाखल अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे — निवडणूक निर्णय अधिकारी १ : २०२ निवडणूक निर्णय अधिकारी २ : १३५ निवडणूक निर्णय अधिकारी ३ : १६० निवडणूक निर्णय अधिकारी ४ : २२२ निवडणूक निर्णय अधिकारी ५ : १८२ निवडणूक निर्णय अधिकारी ६ : १३७ एकूण अर्ज : १०३८
दरम्यान, महायुतीत जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महानगर अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
आता सर्वांचे लक्ष नामनिर्देशन अर्जांच्या छाननीकडे लागले असून, त्यानंतर माघार प्रक्रियेत कोण उमेदवार रिंगणातून बाहेर पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.