BJP Jalgaon Municipal Election: निष्ठावंतांची क्रूर चेष्टा का? भाजप नेते उदय भालेराव यांचा संतप्त सवाल
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली असून, भाजपाचे कार्यालय प्रमुख उदय भालेराव यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उदय भालेराव हे पत्नीसमवेत प्रभाग क्रमांक १३ मधून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
माध्यमांशी बोलताना भालेराव म्हणाले, “भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर अशी क्रूर चेष्टा का केली जाते? एकीकडे तयारी करण्यास सांगायचे आणि दुसरीकडे वेगळाच निर्णय घ्यायचा, हे दुर्दैवी आहे.” याबाबत आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती झाल्याची चर्चा असली, तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक १३ मधून अर्ज भरण्यासाठी भालेराव आले असताना भाजपकडून दुसऱ्या उमेदवाराचे नाव पुढे करण्यात आल्याचे त्यांना समजले.
भालेराव यांनी सांगितले की, “मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मंगेश चव्हाण यांचा फोन आला. प्रभाग १३ मध्ये तयारी आहे का, असे विचारण्यात आले. होकार दिल्यानंतर आम्ही अर्ज भरण्यासाठी आलो; मात्र त्याच प्रभागात दुसऱ्या उमेदवाराला पुढे केल्याचे कळले. याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती.”
“गेल्या पन्नास वर्षांपासून मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केला असून, शासनाने मला सर्वात लहान बाल सत्याग्रही म्हणून सन्मानित केले आहे. रात्री उशिरा तयारी करण्यास सांगून सकाळी वेगळाच निर्णय घेतला जाणे, हे अत्यंत वेदनादायी आहे,” असेही भालेराव यांनी नमूद केले.

