

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरलेला असतानाही सत्ताधारी महायुतीमधील (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. एकीकडे भाजप ५० जागांवर ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) २५ जागांहून कमी घेण्यास तयार नाही. या दोन बड्या भावांच्या वादात राष्ट्रवादीसाठी जागा सोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने महायुतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
आज पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी आणि महानगरप्रमुखांनी आपापले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना किशोर पाटील यांनी गौप्यस्फोट केला की, पहिल्या बैठकीत ५० (भाजप) आणि २५ (शिवसेना) असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, त्यानंतर नेमके काय घडले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि | भाजप नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने पालकमंत्री बैठकीतून उठून गेले होते. यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गिरीश महाजन ५० पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार नसल्याने आणि शिवसेनेने २५ जागांचा आकडा पकडून ठेवल्याने ७५ जागांचा हिशेब इथेच पूर्ण होतो. मग मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) जागा कुठून देणार? हा कळीचा मुद्दा ठरत आहे.
एकीकडे युतीच्या गप्पा, दुसरीकडे स्वतंत्र अर्ज
विशेष म्हणजे, महायुती होणार असे सर्वच नेते जाहीरपणे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र स्वतंत्रपणे अर्ज भरले जात आहेत. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी आपापल्या पक्षाकडून दावेदारी सांगत आहेत. शेवटचा दिवस हातात असताना अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.