

जळगाव: भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवार संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांना हॉटेल रॉयल पॅलेस येथे घेराव घातला. यावेळी संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार भोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रसंगी कुटुंबीय भावनिक झाले होते आणि रडू कोसळले.
उमेदवारी नाकारल्यामुळे इतका मानसिक तणाव निर्माण झाला आहे की आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचे वक्तव्य संगीता पाटील यांनी आमदार राजू मामा भोळे यांच्यासमोर केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
यावेळी संगीता पाटील यांनी सांगितले की, संबंधित प्रभागातील नगरसेवक पद रिक्त असताना नागरिकांनी आम्हाला प्रश्न विचारले होते. त्या काळात आम्हीच पुढाकार घेऊन घाण पाण्याचा प्रश्न नगरपालिकेत जाऊन सोडवला. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे कमळाचा प्रचार केला. सात वर्षांपासून आम्ही प्रभागात काम करत आहोत. मग अचानक दुसऱ्या लोकांना उमेदवारी देण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.
ज्या पद्धतीने आम्ही तुमच्याशी बोलतो, त्याच पद्धतीने तुम्हीही वरिष्ठांशी आमच्यासाठी बोला. आमच्यासाठी गरज पडली तर त्यांच्याशी भांडण करा, असेही संगीता पाटील यांनी आमदार सुरेश भोळे यांना सांगितले. यावेळी आमदार भोळे हतबल झाल्याचे दिसून आले. तसेच, नवीन उमेदवार पक्षाशी गद्दारी करणार नाही याची काय हमी आहे, असा प्रश्न उपस्थित करत, जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कमळाचा प्रचार करणार नाही, असेही संगीता पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.