

जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मंगळवार (दि.30) रोजी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना हा राजीनामा आल्याने चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असतानाच पाटील यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जागावाटपावरून नाराजी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
जळगाव जिल्ह्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले जात होते. मात्र प्रत्यक्षात जागावाटपाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. कोणत्या पक्षाला किती जागा, कोणत्या प्रभागात कोणाची उमेदवारी, यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या अनिश्चिततेमुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
आज नामनिर्देशनाचा अखेरचा दिवस असताना अनेक प्रस्थापित नेते अर्ज दाखल करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर अभिषेक पाटील यांच्यासारख्या तरुण आणि प्रभावी नेतृत्वाचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला आहे. पाटील यांनी राजीनाम्याचे ठोस कारण जाहीर केले नसले तरी जागावाटपातील अन्याय, अंतर्गत गटबाजी किंवा निर्णयप्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या राजीनाम्यानंतर जळगावच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे. अभिषेक पाटील पुढे अपक्ष निवडणूक लढवणार की अन्य पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या घडामोडींचा महायुतीच्या निवडणूक रणनीतीवर नेमका काय परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.