

जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या 'मुक्ताई' बंगल्यात 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 6 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल (रोख रक्कम) जप्त करण्यात आला आहे. मात्र, या चोरीचा मुख्य सूत्रधार आणि त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली.
आरोपी जाळ्यात कसे अडकले?
तपासादरम्यान, पोलिसांनी प्रथम जळगाव येथील अल्लाउद्दीन हास्नोनौद्दीन शेख (वय 29) याला ताब्यात घेतले. त्याची मोटारसायकल चोरीसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीतून मुंबई व कल्याण येथील टोळीचा सहभाग उघड झाला. या टोळीकडून चोरीचा मुद्देमाल उल्हासनगर येथील चिराग इकबाल सय्यद याच्याकडे विक्रीसाठी देण्यात आला होता. चिराग सय्यदने हा मुद्देमाल कल्याण येथील कैलास हिराचंद खंडेलवाल याला विकला होता.
पोलिसांनी अल्लाउद्दीन शेख, चिराग सय्यद (उल्हासनगर) आणि कैलास खंडेलवाल (कल्याण) या तिघांना अटक केली आहे. अटकेनंतर खंडेलवालकडून संपूर्ण मुद्देमाल रोख रकमेच्या स्वरूपात हस्तगत करण्यात आला आहे. इजाज अहमद याच्याविरुद्ध माटुंगा, बीपी रोड, नारकोली, ताडदेव, नवाकाळ, वापी अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
मोहम्मद बिलाल आणि इजाज अहमद यांच्यावर मुंबईतील एमआयडीसी, ताडदेव पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांची पथके या मुख्य आणि सराईत आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तीन आरोपी अद्यापही तुरुंगाबाहेर
या घरफोडीचा मुख्य सूत्रधार असलेला मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी याच्यासह इजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि मोहम्मद अमीर उर्फ बाबा शेख (सर्व रा. कल्याण) हे तिघे आरोपी अजूनही फरार आहेत.