

जळगाव : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव येथे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान जीएस ग्राउंड, शिवतीर्थ येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार स्मिता वाघ आणि आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचा उद्देश केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा असून, नागरिकांना थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे. याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दीपक परदेशी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
खासदार वाघ यांनी सांगितले, या प्रदर्शनात कृषी, ग्रामीण विकास, भूगर्भशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, जैव सुरक्षा, आयुष, होमिओपॅथी अनुसंधान परिषद, केंद्रीय मत्स्यपालन विभाग, महाऊर्जा, भारतीय मानांकन ब्युरो (BIS), आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) अशा अनेक विभागांचे स्टॉल उभारले जाणार आहेत.
या स्टॉलवर संबंधित विभागांचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित राहून योजनांची सविस्तर माहिती देतील. नागरिकांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन मिळावे आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.