

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि.29) रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महायुतीबाबत अद्याप स्पष्ट घोषणा झालेली नसतानाही अनेक दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपली दावेदारी पक्की केली आहे.
महायुतीची घोषणा सध्या केवळ भाजप आणि शिवसेनेकडून होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस युतीत आहे की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तसेच जागावाटपाबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीदेखील मंगळवार (दि.30) रोजी आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास घाई केली आहे.
चोपडामधून चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा व मुलीचेही नामनिर्देशन
माजी महापौर भारती सोनवणे यांच्या मुलांनी दोन वेगवेगळ्या प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार सुरेश भोळे आणि त्यांची पत्नी, माजी महापौर सीमा भोळे यांनीही अर्ज भरले आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मुलगा व मुलीनेही नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व महानगरप्रमुख यांनीही आपली उमेदवारी दाखल केली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर नितीन लढ्ढा यांनीही अर्ज भरला आहे. कोणतीही युती किंवा आघाडी अधिकृतरीत्या जाहीर न झालेली असतानाही अनेक प्रभागांमध्ये नेत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपली उपस्थिती नोंदवली आहे. महायुती असो वा महाआघाडी, अनेक ठिकाणी नेत्यांनी स्वतःऐवजी आपल्या मुलांना पुढे केल्याचे चित्र दिसून येत आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून ए.बी. फॉर्म वितरित करण्यात आलेले नाहीत.
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वेळ संपण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांना टोकन देण्यात आले असून साडेचार वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली.