बचत गटांच्या पोषण आहार मानधनात वाढ करावी : आमदार कुणाल पाटील यांची अधिवेनशात मागणी

आमदार कुणाल पाटील
आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीतील बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जातो. त्याबदल्यात बचत गटांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. त्यामुळे सदर मानधनात वाढ करुन ते २० रुपये करण्यात यावे, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी अधिनशेनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. दरम्यान, मानधन वाढीचा निर्णय विचाराधीन असल्याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.

बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी होवून बालके सुदृढ व्हावीत म्हणून शासनाकडून अंगणवाडीतील बालकांना बचतगटांकडून पोषण आहार देण्यात येतो. त्याकरीता प्रति लाभार्थी देण्यात येणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी विधानभवनात केली आहे. आमदार पाटील यांनी सांगितले की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बचत गटातील महिला आहार तयार करुन देतात. सन २०१६-१७ पासून बचत गटातील महिलांना प्रति लाभार्थी ८ रुपये मानधन दिले जाते. मात्र सद्यस्थितीत महागाईने उच्चांक गाठला आहे. आहार तयार करण्यासाठी लागणारा भाजीपाला, कडधान्य, गोडेतेल, गॅस इंधन तसेच इतर साधनसामुग्री व साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे पोषण आहार बनविणे न परवडणारे झाले आहे. म्हणून या मानधनात वाढ करुन ते प्रति लाभार्थी २० रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, गेल्या दहा महिन्यापासून पोषण आहाराचे मानधन थकले आहे. ते मानधनही त्वरीत अदा करण्याची मागणीही पाटील यांनी केली.

अधिवेनशात पाटील यांनी मागणी केल्यानुसार विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, थकलेले मानधन देण्याच्या सूचना संबधित विभागाला लगेच दिल्या जातील. तसेच मानधन वाढीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे महिला बचत गटातील कार्यकर्त्या महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news