नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे वादग्रस्त खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर अवैध खनिज उत्खनन केल्याचा गंभीर आरोप झाला असून या आरोपाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने समितीची स्थापना केली आहे. महिला कुस्तीपटुंच्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणानंतर अवैध उत्खनन प्रकरणातही सिंग यांचे नाव आल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. (Brij Bhushan Singh)
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मजहरथ, जैतपूर आणि नवाबगंज या गावांमध्ये सिंग यांनी अवैध खनिज उत्खनन होत आहे. आणि यातून दररोज सातशे ट्रक खनिजाची वाहतूक होत असल्याचे एनजीटीसमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. सिंग यांनी २० लाख क्यूबिक मीटर इतक्या खनिजाची विक्री केल्याचा आणि उत्खननामुळे प्रतापगड येथील पुलाचे व रस्त्याचे नुकसान झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सिंग यांच्याविरोधातील आरोप गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापन केली जाईल, असे राष्ट्रीय हरित लवादाकडून सांगण्यात आले. (Brij Bhushan Singh)
चौकशीसाठी नेमण्यात जाणाऱ्या समितीत केंद्रीय वन आणि पर्यावरण, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय गंगा नदी स्वच्छता अभियान, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व गोंडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल. एका आठवड्याच्या आत घटनास्थळी जाऊन पाहणी करावी व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही लवादाच्या खंडपीठाने दिले आहेत.
हेही वाचा;