

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध विकासकामे राबविले जात आहेत. त्यासाठी जिल्ह्याला हजारो कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही कामे अतिशय जबाबदारीने करा, जर या कामांचा दर्जा निकृष्ट आढळला तर ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
जलजीवनची कामे ठरावीक ठेकेदारांना दिली जात असून, त्यातून कामाचा दर्जा टिकणार का? हा विषय दैनिक 'पुढारी'ने उजेडात आणला होता. त्याची दखल घेेत ना. डॉ. पवार यांनी अधिकार्यांना या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. त्यामुळे 'हर घर पाणी' ही योजना राबविण्यासाठी संबंधित गाव खेड्यांमधील कामे चांगल्या दर्जाने पूर्ण करा. जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागांमार्फत करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावीत.
तसेच ज्या ठिकाणी ही कामे झाली आहेत तेथे त्या कामांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता सुरक्षेबाबत मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणार्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येऊन त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच स्वयंसेवी संघटनांची मदत घेऊन शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही ना. डॉ. पवार यांनी दिल्या.