नगर : ‘रोहयो’तून बेरोजगारांच्या खिशात 20 कोटी | पुढारी

नगर : ‘रोहयो’तून बेरोजगारांच्या खिशात 20 कोटी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागाने सात महिन्यांत 1079 कामांवर 3828 मजुरांच्या हातांना काम दिले आहे. घरकुल, वृक्षलागवड, रस्त्याच्या दुर्तफा वृक्षलागवड, विहिरी आणि पानंद व अन्य रस्त्यांच्या अशा कामांतून मजुरीवर 20 कोटी 19 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुसूचित जाती जमाती,दारिद्रय रेषेखालील कुटूंब, शेतकरी, शेतमजूर व दुर्बल घटकांना कामाचा व सन्मानाने जगण्यासाठी कायदेशीर अधिकार मिळालेला आहे.

सन्मानाने जगता यावे, जिल्ह्यातील प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले पाहिजे,यासाठी रोहयोतून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. नगर जिल्ह्यासाठी रोहयोतून 20 लाख मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ग्रामपंचायत विभागाअंतर्गत 10 लाख मनुष्य रोजगार निर्मितीचे आव्हान होते. मात्र ‘रोहयो’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा होजगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात 8 महिन्यांतच 75 टक्के उद्दिष्ठ गाठले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत 7.50 लाख मनुष्य दिवस उपलब्ध करून देण्यात नगरला यश मिळाले आहे.

‘रोहयो’ साठी 60 टक्के कुशल आणि 40 टक्के अकुशल मजुरांवर खर्च केला जातो. मजुरासाठी 256 रुपये रोजंदारी दिली जाते. मात्र रस्त्याच्या कामांवरील मजुरांना कामाच्या प्रमाणानुसार ती रोजंदारी अदा केली जाते. कुशल आणि अकुशलवर आतापर्यंत 32 कोटी 14 लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. यापैकी 20 कोटी 19 लाख रुपये हे मजुरीवर खर्च झाले असून, उवर्रीत 12 कोटी रुपये हे कुशल मजूर आणि इतर खर्च झाल्याचे रोहयोतून समजले आहे.

‘रोजगार दिवस’ खरच साजरा होतो का?

ग्रामपंचायत स्तरावर दर महिन्याला रोजगार दिवस घेतला जातो. लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबद्दल माहिती मिळावी, हा रोजगार दिवसाचा उद्देश आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’ची कामगिरी चांगली असली, तरीही किती ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला हा रोजगार दिवस साजरा केला जातो, याविषयी संशोधनाची गरज आहे.

Back to top button