श्रीगोंदा नगराध्यक्षांवरील ‘अविश्वास’ची चौकशी पूर्ण | पुढारी

श्रीगोंदा नगराध्यक्षांवरील ‘अविश्वास’ची चौकशी पूर्ण

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाबाबत नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यासह सोळा नगरसेवकांचे लेखी, तसेच तोंडी म्हणणे चौकशी अधिकारी प्रशांत खांडकेकर यांनी सोमवारी दिवसभर चाललेल्या चौकशीत जाणून घेतले. त्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाविषयी नगराध्यक्षा व नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

सोमवारी चौकशी अधिकारी खांडकेकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांसह सोळा नगरसेवकांची मुखाधिकार्‍यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत खांडकेकर यांनी नगराध्यक्षांसह सोळा नगरसेवकांचे तोंडी म्हणणे जाणून घेतले. मांडलेले म्हणणे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेत कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर चौकशी अधिकारी प्रशांत खांडकेकर त्याबाबतचा लेखी अहवाल तयार करणार असून, तो जिल्हाधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे.

अविश्वास ठराव प्रकरणातील चौकशी अधिकारी प्रशांत खांडकेकर यांनी सादर केलेल्या अहवालावर स्वतः जिल्हाधिकारी निर्णय घेणार की निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडे पाठविला जाणार ? याची उत्सुकता श्रीगोंद्यासह तालुक्यातील सर्वांना लागून आहे.

Back to top button