

जळगाव पुढारी वृत्तसेवा : वही गायनाच्या माध्यमातून खान्देशच्या संस्कृतीचा उहापोह केला जातो. मात्र, आज पर्यंत राजकीय पदाधिकाऱ्यांनी वही गायन कलेचे महत्व जाणून घेतले नाही. या कलावंतांना पुढे आणण्यासाठी व जिल्ह्यात लोककला रुजवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, भविष्यात लोक कलेचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करू यासह वही गायन करणा-या कलावतांना शाहीर ही पदवी मिळवून देणार अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
खानदेश लोक कलावंत विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे रविवारी वही गायन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी उद्घाटन प्रसंगी गुलाबराव पाटील बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, कलावंतांसाठी कोणीच काही केले नाही. आमच्या कामात हात घालणा-यांचा डफ वाजवल्याशिवाय राहणार नाही असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. लोककला भवनासाठी जागेची निवड करा, त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून संमेलनासाठी मंत्र्यांनाच बोलवू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
कलावंतांना अनुदान, शाहिराचा दर्जा, राज्य पुरस्कारासह तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी राज्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी केली. यावेळी रघुनाथ महाजन वाघोड तालुका रावेर यांना प्राचार्य किसन पाटील स्मृती वही गायन जीवन गौरव पुरस्कार, शिवाजीराव पाटील (नगरदेवडा )यांना स्वर्गीय शाहीर दिलीप सखाराम जोशी स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शाहीर बारकू पिराजी जोगी( एक लग्न) यांना स्वर्गीय नथूभाऊ सोनवणे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.