कोल्हापूर : ‘उत्तर’चे चक्रव्यूह भेदण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

कोल्हापूर : ‘उत्तर’चे चक्रव्यूह भेदण्याचे शिवसेनेसमोर आव्हान
Published on
Updated on

कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून बहुतांशवेळा मतदारांनी धनुष्यबाणालाच साथ दिली. गेल्या निवडणुकीत मात्र ऐनवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या उमेदवाराने शिवसेनेला नमविले. आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी काँग्रेस—राष्ट्रवादीसह भाजपनेही कंबर कसली आहे; मात्र ज्या पक्षाचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या शिवसेनेच्या गोटात मात्र अद्याप शांतता आहे. 'मातोश्री'मधून भूमिका स्पष्ट न झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला या फॉर्म्युल्यानुसार 'उत्तर'वर हक्क सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढाईची तयारी सुरू केली आहे. भाजपही मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. भाजपने निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने सर्व्हे केल्याचेही सांगण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेना मात्र मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांचे लक्ष 'मातोश्री'कडे लागले आहे. परिणामी, 'कोल्हापूर उत्तर'ची निवडणूक लढविण्यापासून ती जिंकण्यापर्यंतचे चक्रव्यूह भेदण्याचे आ?व्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेने धनुष्यबाण खाली ठेवून काँग्रेसला हात दिल्यास भविष्यात कोल्हापूर शहरातील राजकारण बदलणार आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

2019 च्या निवडणुकीवेळी सर्व पक्ष स्वतंत्रपणे रणांगणात उतरणात होते. भाजपकडून उद्योजक चंद्रकांत जाधव इच्छुक होते. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना पक्षात घेऊन काँग्रेसची उमेदवारी दिली. जाधव यांनी क्षीरसागर यांचा पराभव करून त्यांची हॅट्ट्रिक रोखली. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना पराभवानंतरही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले.

काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन झाल्याने पोटनिवडणूक लागणार आहे. महाविकास आघाडी फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा मिळणारच, हे गृहित धरून तयारी सुरू केली आहे. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व महापालिकेच्या मागील सभागृहातील भाजपच्या नगरसेविका श्रीमती जयश्री जाधव यांची उमेदवारीही काँग्रेसने जाहीर केली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आ?वाहन पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. परंतु, कालांतराने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकात पाटील यांनी श्रीमती जाधव यांची भेट घेऊन भाजपकडून लढण्याची विनंती केली. परंतु श्रीमती जाधव यांनी त्यांची विनंती अमान्य केली. परिणामी, भाजपनेही रणशिंग फुंकले आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या नावाचा अहवाल राज्य समितीला पाठविला आहे. निवडणूक जाहीर होताच त्यापैकी एकाची उमेदवारी जाहीर होईल. सत्यजित कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी दाट शक्यता आहे.

कोल्हापूर शहरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री शिवसेनेचे असल्याने शहरासाठी गेल्या दोन वर्षांत राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. रंकाळा संवर्धनासह रस्ते व इतर विकासकामांचा त्यात समावेश आहे. परिणामी, शिवसेनेने ही निवडणूक लढवावी, असा दबाव कार्यकर्त्यांतून आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, सर्व जिल्हाप्रमुख आदींनी बैठक घेऊन कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचाच हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे संबंधितांनी लढण्यासाठी मागणीही केली आहे.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला दहापैकी सहा आमदार निवडून दिले. शिवसेनेला जिल्ह्यात पहिल्यांदाच घवघवीत यश मिळाले. परंतु, हे यश फार काळ टिकविता आले नाही. 2019 च्या निवडणुकीत सहापैकी पाच आमदारांचा पराभव झाला. त्याला शिवसेनेतील गटबाजीच कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रचंड गटबाजी असल्यानेच कोल्हापूरात तीन जिल्हाप्रमुख नेमण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. गटबाजी संपविल्यास शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

अपवाद वगळता शिवसेनेचेच वर्चस्व

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून 1990 पासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. अपवाद फक्त 2004 व 2019 चा आहे. 1995 व 1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांनी विजय मिळविला होता. 2004 मध्ये मात्र मालोजीराजे यांनी त्यांचा पराभव करून हॅट्ट्रिक रोखली. 2009 मध्ये मात्र शिवसेनेने राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेतला. 2014 मध्येही क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचा भगवा फडकविला.

विधानसभेचा निकाल

  • 1990 – शिवसेना
  • 1995 – शिवसेना
  • 1999 – शिवसेना
  • 2004 – काँग्रेस
  • 2009 – शिवसेना
  • 2014 – शिवसेना
  • 2019- काँग्रेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news