जळगाव : चार लाखांची केळीची खोडे कापली : चिनावल शिवारातील शेतकरी संतप्त

जळगाव : चार लाखांची केळीची खोडे कापली : चिनावल शिवारातील शेतकरी संतप्त
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा : चिनावलसह परिसरातील शिवारांमधील चोरींमुळे शेतकरी त्रस्त झाले असतांना आता याच शिवारातील एका शेतातून तब्बल चार लाख रूपयांची केळीची खोडे कापल्याचा भयंकर प्रकार घडल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी एकवटले.  डीवायएसपी लावंड यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्याने शेतकरी शांत झाले.

चिनावल येथे गेल्या ८ दिवसांपासून पीक चोरी व हेतुपुरस्कर नुकसानी करण्याचे प्रकार सर्रास वाढले असून चिनावल हे पीक चोरी व नुकसानी चे हॉट स्पॉट ठरले आहे. यातच काल दि. २२ चे रात्री चिनावल शिवारातील अरविंद भास्कर महाजन यांचे सावखेडा डोंगर रस्त्यावर असलेल्या शेतात कमलाकर नारायण भारंबे यांनी केळी लागवड केली आहे. यातील 1 हजार  केळीचे घड असलेले खोड कापून नुकसान करीत चोरट्यांनी सुमारे ४ लाख रूपयांचे नुकसान केल्याने चिनावल व परिसरात मोठी खळबळ उडाली. यामुळे शेतक-यांनी संतप्त होत चिनावल येथील पोलिस चौकीवर घटनास्थळी आलेल्या पोलिस अधिकार्‍यांना घेराव घातला.  यावेळी गावाला पोलिस छावणीचे रूप आले होते.

दरम्यान गेल्या १९ फेब्रुवारी ला शेतकरी तरुणांना या पीक चोरट्यांनी मारहाण केली होती. या बाबत सावदा पोलिस स्टेशनला शेतकरी तुषार महाजन यांनी तक्रार दिली. याचा राग आल्याने दुसर्‍याच दिवशी या शेतकर्‍यांचे सुमारे ४० ते ५० घड कापून नुकसान केले होते. या घटनेला एक दिवसही उलटत नाही तोच त्याच रस्त्याने कमलाकर भारंबे यांनी लागवड केलेल्या केळी बागातून आज रोजी १००० तयार केळी खोड कापून नुकसान केल्याने या शेतकर्‍यांचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे चिनावल येथे रस्त्यावर उतरून पोलिस मदत केद्रासमोर शेतक-यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखत मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड व सावदा पो.स्टे.चे स.पो.नि.देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसानीची पाहणी करून चिनावल येथील मराठी शाळेत संतप्त झालेल्या शेतकर्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी उपस्थित अधिकार्‍यांसमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. येथील श्रीकांत सरोदे, नुकसानग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे, तुषार महाजन, गोपाळ नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, माजी सरपंच योगेश बोरोले, कुंदन पाटील यांनी शेतकर्‍यांना होणार्‍या त्रास बद्दल माहिती दिली.

ज्याच्यांकडे जमीन नाही, चार्‍याची व्यवस्था नाही, विशेष म्हणजे जे बाहेर गावाहून गावात राहण्यासाठी आलेले लोक शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात आपली गुरे चारतातच. केळीचे घड चोरुन नेतात. कोणी शेतकर्‍याने हटकल्यास मारहाण करतात. या त्यांच्या दादागिरीमुळे शेतकर्‍यांना त्यांच्याच शेतात जाण्यास घाबरावे लागत आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून अशा उपद्रवी चोरट्यांचा बंदोबस्त होणार की नाही? असा सवाल उपस्थित शेतक-यांनी केला. या वेळी गावात मोठ्या तणावाचे वातावरण तयार झाले होते. अशा चोरट्या प्रवृत्तीच्या लोकांना गावातून हाकलून लावा अशी जोरदार मागणी शेतकर्‍यांनी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, एपीआय इंगोले यांनी शेतकर्‍यांना सदर चोरट्यावर गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले.

दरम्यान नेहमीच शेतकर्‍यांना अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. त्यातच ही मानव निर्मित दहशती मुळे शेतकरी भयभीत झाले आहे. आजच्या या केळी खोड कापून केलेल्या नुकसानी ने शेतकर्‍यांनचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता खचला आहे. या पुढे तरी पोलिस प्रशासनाने परिसरातील पिक संरक्षण संस्था व पिक चोरी संदर्भात तक्रार घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना पोलिस स्टेशन ला सन्मान देवून तक्रार दाखल करून घ्या, दोषी ना पाठीशी घालू नका या मागण्या शेतकर्‍यांनी केल्या.

दरम्यान  झालेल्या नुकसानी बाबत शेतकरी कमलाकर भारंबे यांनी सावदा पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून यात निखिल कमलाकर भारंबे व कमलाकर नारायण भारंबे यांचे सुमारे ४ लाख रुपयांची नोंद करण्यात आली असून हे नुकसान करणार्‍या अज्ञात ईसमा विरुद्ध भादंवि कलम ३७९ ,४२७ , गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि देविदास इंगोले, पो.उप.निरिक्षक राजेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली हे. का. पोहेकर व त्यांचे सर्व सहकारी तपास करीत आहे. दरम्यान नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाचे मडळाधिकारी जे डी. भंगाळे व तलाठी लिना राणे यांनी करुन वरीष्ठ स्तरावर पाठवला आहे.

चिनावल मध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या वेळी चिनावल पिक संरक्षण संस्था तर्फे ही दोषी वर कारवाई चे निवेदन देण्यात आले आहे. याच अनुषंगाने सध्या ४ वाजता चिनावल , खिरोदा ,रोझोदा कोचूर येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर चे अधिकारी कैलास कडलग यांना या नुकसानी व गुन्हेगारी चा बंदोबस्त करण्याच्या मागणी चे निवेदन देण्यात आले यात शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास परिसरातील शेतकरी कोणतताही शासकीय कर भरणार नसल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान दि. १९ रोजी शेतकरी मारहाण प्रकरणात आरोपी रामा शामराव सपकाळे, प्रकाश शामराव सपकाळे, अनिता रामा सपकाळे यांना अटक करण्यात आली आहे. आज चिनावल, सावदा पोलिस स्टेशन व फैजपूर येथे परिसरातील शेतकरी श्रीकांत सरोदे, गोपाळ नेमाडे, पोलिस पाटील निलेश नेमाडे, माजी सरपंच योगेश बोरोले, चंद्रकांत भंगाळे, राजेश महाजन, सूरज भारंबे, विनायक महाजन, ठकसेन पाटील, पंकज नारखेडे, कल्पेश नेमाडे, बापू पाटील, योगेश महाजन संदिप महाजन, दिनेश महाजन, हितेश भंगाळे, कोचूर येथील पंकज पाटील, कमलाकर पाटील, रोझोदा येथील भरत लिधुरे, चंद्रकांत गारसे स्वप्निल पाटील, मिलिंद भंगाळे, हितेश भंगाळे, तुषार महाजन, अशोक महाजन, परेश महाजन, सागर भारंबे व शेतकरी मोठ्या उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news