पुणे : शरद पवारांनी 50 वर्षे जातीचे राजकारण केले | पुढारी

पुणे : शरद पवारांनी 50 वर्षे जातीचे राजकारण केले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘शरद पवार यांनी गेली पन्नास वर्षे जातीय राजकारण करीत समाजात जातीयवाद निर्माण करण्याचेच काम केले आहे. मात्र, आता त्यांना मराठा आणि मुस्लिम समाजानेही पुरते ओळखले आहे,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात पाटील यांनी बुधवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर महापौर कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘भाजप केंद्रातील तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. जे मुस्लिम नेते त्यांच्या विरोधात मत मांडतील, त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात आहे,’ असा आरोप केला आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी, पवार यांनी स्वत:च पन्नास वर्षे जातीचे राजकारण केल्याचे प्रत्युत्तर दिले.

नबाव मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंत्र्यांचे आंदोलन

‘कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर पवार यांनी लगेच यामागे भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटेंचा हात असल्याचा आरोप केला. पवार यांना मुस्लिम समाजाचा एवढा पुळका आहे, तर मग मुस्लिम समाज शिक्षण व नोकर्‍यांमध्ये मागे का आहे? त्यांना छत्र्याच का नीट कराव्या लागतात?’ असा सवाल केला. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करीत नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावर पाटील म्हणाले, ‘ज्यांना असे वाटते, त्यांनी खुशाल न्यायालयात जावे.’

Russia-Ukraine war Live Updates : रशियाची ५ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली, युक्रेनचा दावा

पदाधिकारी भूमिका स्पष्ट करतील

जायका व नदी सुशोभीकरणाच्या प्रकल्पासंदर्भात ज्या शंका आहेत, त्यावर दोन दिवसांत महापौर, सभागृहनेते व इतर पदाधिकारी भूमिका स्पष्ट करतील. वडगाव शेरी येथील शाळेसाठी आरक्षित जागेवर शाळेचे बांधकाम करण्यास बिल्डरला परवानगी दिल्याच्या विषयावरही भूमिका मांडली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

पुणे पोलिस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते!

महापालिका निवडणूक समोर असल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. पुण्याची अनेक पोलिस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करीत असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

Back to top button