फ्लॅशबॅक : नाशिक मनपाची पहिलीच निवडणूक आणि खर्च ‘इतका’

फ्लॅशबॅक : नाशिक मनपाची पहिलीच निवडणूक आणि खर्च ‘इतका’
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसंदर्भातील अनेक किस्से आणि घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता तर होतीच शिवाय पहिला विजयाचा मान पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी कंबरही कसली होती. त्यापैकीच एक म्हणजे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल. त्यांनी अवघ्या साडेबारा हजार रुपयांत 1992 ची निवडणूक लढवत शिवसेनेेचे माजी महानगरप्रमुख विनायक पांडे यांचा पराभव केला होता.

1992 च्या निवडणुकीसाठी एकसदस्यीय एकूण 85 वॉर्ड होते. त्यावेळी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनच प्रमुख पक्ष होते. अपक्ष निवडणूक लढविणा र्‍यांचा भरणा अधिक होता. यामुळे एक-एका वॉर्डात जवळपास 30 हून अधिक उमेदवार एकमेकांसमोर ठाकलेले होते. भाजपने पुरोहित सतीश शुक्ल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांच्यासमोर उभे होते ते शिवसेनेचे महानगरप्रमुख विनायक पांडे. निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवार असूनही त्यावेळी एकमेकांचा खूप आदर असायचा. यासंदर्भातील एक आठवण सांगताना शुक्ल म्हणाले की, मी प्रचारासाठी जुने नाशिकमधील काही भागात गेलो असता त्या ठिकाणी खुद्द पांडे यांनी माझी अनेक नागरिकांशी भेट घडवून आणत खिलाडू वृत्ती दाखविली.

शुक्ल यांनी त्यांच्यासमोरील काँग्रेससह बहुतांश सर्वच उमेदवारांचे डिपॉझीट जप्त केले होते. 1992 ते 1997 या कालावधीत केलेल्या कामाबद्दल श्रीसंत गाडगे महाराज पतसंस्थेतर्फे उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. पुरस्कार निवड समितीत कवी तात्यासाहेब शिरवाडकर तसेच अ‍ॅड. तोष्णीवाल अशी दिग्गज मंडळी होती. नगरसेवक काळात वॉर्डातील पथदीप, ड्रेनेजलाइन ही महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण केली. याशिवाय गुलालवाडी येथे व्यायामशाळा, अग्निशमन इमारतीला हुतात्मा वीरबापू गायधनी यांचे नाव, सीबीएस चौकाला हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे तसेच जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचे काम केल्याची आठवण सतीश शुक्ल यांनी सांगितली.

पिंपळपारासाठी साडेसात लाख
जुने नाशिकचीच नव्हे, तर अवघ्या नाशिक शहराची सांस्कृतिक अशी ओळख असणार्‍या पिंपळपार नगरसेवक निधीतून उभारण्यात आला आणि त्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च झाल्याचे सांगत पिंपळपार उभारण्यासाठी नेवासा येथून दगड आणल्याचे शुक्ल यांनी सांगितले.

सर्वाधिक मते नामदेव महाले यांना
1992 च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 42 चे काँग्रेसचे उमेदवार नामदेव महाले यांना 5,181 इतकी सर्वाधिक मते मिळाली होती. तसेच वॉर्ड क्रमांक 55 चे शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांना 2,418 इतकी मते मिळाली होती. तर वॉर्ड क्रमांक 38 चे काँग्रेसचे उमेदवार मधुकर गायकवाड हे अवघ्या 386 मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news