रुग्णांचेच नव्हे, सिव्हिलचेही स्वास्थ्य बिघडले

जिल्हा रुग्णालय, नाशिक www.pudhari.news
जिल्हा रुग्णालय, नाशिक www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे 

जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. उपचार होतात मात्र, काही जणांकडून त्यांना अनेकदा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र असते. अशक्त रुग्णांना जेवण घेण्यासाठी रांगेत उभे राहावे, नातलगांनाच रुग्णांना कक्षात ने-आण करावी लागते. भुरट्या, वाहनचोरी या तर नित्याच्याच झाल्या आहेत. सुरक्षितता फक्त दिखाव्यापुरतीच असल्याचे अनेक घटनांवरून दिसते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे झाले असून, वरिष्ठांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.

जिल्हा रुग्णालयात आदिवासी तालुक्यांसह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर उपचार होतात. मात्र, रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातलगांना वेगळाच त्रास सहन करावा लागत असतो. रुग्णांना जेवणासाठी ताटात जेवण देणे आवश्यक असताना, कंत्राटदाराकडून ताट पुरवले जात नव्हते. त्यामुळे रुग्णांना मिळेल त्या डब्यात किंवा भांड्यात वरण-भात, भाजी-पोळी एकत्रित घ्यावी लागत होती. आता काही दिवसांपासून ताट मिळत असले, तरी सर्व रुग्णांना ताट मिळतच नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्याकडील भांड्यातच जेवण घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे सकाळी 11 ते 12 च्या सुमारास दुपारचे जेवण दिले जाते आणि त्यानंतर अवघ्या पाच ते साडेपाच तासांनी रात्रीचे जेवण दिले जात असल्याने रुग्णांना भूक नसतानाही जेवण घेऊन रात्री थंड झालेले अन्न खावे लागत असते. प्रत्यक्षात रात्रीचे जेवण सायंकाळनंतर देणे व वेष्टन लावलेल्या ताटात देणे अपेक्षित असताना, तसे होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे अशक्त, जखमी असलेल्या रुग्णांना त्यांच्या खाटेवरच जेवण देणे बंधनकारक असताना, कर्मचार्‍यांकडून त्यांना एका ठिकाणी बोलावून जेवण दिले जाते. जेवणाचे ताट धुण्याची सक्ती रुग्णांवरच असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे रुग्णांना जेवण घेण्यासाठीही कसरत करावी लागते.

दुसरीकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरवर बसवून संबंधित डॉक्टरकडे किंवा कक्षात नेण्याची जबाबदारी कर्मचार्‍यांवर सोपवलेली आहे. मात्र, अनेकदा संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याने हे काम नातलगांनाच करावे लागत असल्याचे वारंवार दिसते. त्यामुळे रुग्णाला अनेकदा त्रासही होत असतो. रुग्णालयाची सुरक्षितता हा कायम चर्चेचा विषय होतो. गत वर्षी एका व्यक्तीने चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. तरीदेखील रुग्णालयीन प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली दिसत नाही. त्यांची भिस्त खासगी सुरक्षारक्षक व सीसीटीव्हीवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसतात. रुग्णालयाच्या आवारातून अनेकदा भुरट्या चोर्‍या, वाहन चोरीचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच तीन महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात वावरताना आढळून आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेते रुग्णालयाच्या प्रशासनाने चुकीच्या सवयी मोडणे अपेक्षित असून, रुग्ण व त्यांच्या नातलगांना चांगल्या उपचारांसोबतच इतर हक्कही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news