कडेगाव : युक्रेनमधून परतलेेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय | पुढारी

कडेगाव : युक्रेनमधून परतलेेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय

कडेगाव : रजाअली पिरजादे

वैद्यकीय शिक्षणासाठी सांगली जिल्ह्यातून युक्रेनला गेलेले विद्यार्थी युद्धामुळे जीव मुठीत धरून मायदेशी सुखरूप परतले. या विद्यार्थ्यांना अर्ध्यावर आपले वैद्यकीय शिक्षण सोडून परतावे लागल्याने या विद्यार्थ्यांसह युक्रेनहून परतलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.

युक्रेनमधून परतलेल्या या विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असे केंद्र व राज्य शासनाकडून सांगण्यात आले होतेे. मात्र ही केवळ आश्वासनांची खैरातच ठरली आहे. दिलेल्या आश्वासनाबाबत अद्याप कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर पुढील शिक्षणासाठी देशातच वैद्यकीय महाविद्यालयात योग्य शुल्कामध्ये प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली यादव, हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या पाटील तर जत तालुक्यातील दिघंची येथील आदित्य पुसावळे, विशाल मोरे, संध्या मोरे, स्नेहल सावंत व विठलापूर येथील कोमल लवटे हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे हे विद्यार्थी युक्रेनमधेच अडकले होते. भयानक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन ते सुखरूप मायदेशात परतले.

शासकीय शुल्क आकारावे…

माझा मुलगा व अन्य विद्यार्थी हे मायदेशात सुखरूप परतले, याचा आम्हाला आनंद आहे. परंतु त्यांचे पुढील शिक्षण कसे होणार याची चिंता आम्हाला लागली आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. सरकारने या विद्यार्थ्यांना भारतात पुढील शिक्षणासाठी प्रवेश द्यावा. तसेच त्याचा शुल्क शासकीय आकारावा.
– सुभाष मोरे, पालक, दिघंची.

Back to top button