कोल्हापूर : पालकमंत्र्यांचे अजिंक्यतारा कार्यालय गुलालाने न्हाले !

कोल्हापूर : पालकमंत्र्यांचे अजिंक्यतारा कार्यालय गुलालाने न्हाले !

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अत्यंत चुरशीने झालेल्या व भारत देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी विजय मिळवत विरोधकांचे मनसुबे उधळले. जाधव यांची विजयाकडे सुरू असलेली घोडदौड ऐकून कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाच्या आवारात जमून गुलालाची अलोट उधळण केली. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि 'नाद करायचा नाही, बंटी पाटलांचा' या डीजेवर लावलेल्या गाण्याच्या तालावर तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघाली. 'दादा (चंपा) गेले हिमालयात', 'अण्णांच्या माघारी नाना झाले कर्जबाजारी' या घोषणा देण्यात आल्या. 'मंत्री सतेज पाटील यांचा विजय असो'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय गृहीत धरून सकाळपासूनच अजिंक्यतारा कार्यालयासमोर जल्लोषाची तयारी सुरू झाली. झेंडे नेण्यासाठी चढाओढ सुरू होती. कार्यकर्तेही हातात झेंडे घेऊन विजयाच्या घोषणा देत होते. बुलेटचे सायलेन्सर काढून जल्लोष सुरू होता. फेरीनिहाय आकडेवारी जाहीर होईल तसा विजयाचा जल्लोष वाढत होता. विजय संयमाने घ्यावा, असे आवाहन केले जात होते, तरीदेखील उत्साह कमी होत नव्हता. फेरीनिहाय मतदान जाहीर करण्यासाठी माईकची सोय केली होती.
'

वो शेट, तुम्ही नादच केलाय ग्रेट', 'बंटी बंटी' गाण्यावर तरुण थिरकले. दुपारी 12 वा. अजिंक्यतारा हाऊसफुल्ल झाले. कार्यकर्त्यांच्या गर्दीने पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. तरुणवर्गाची संख्या जास्त होती. झेंडे फिरवत गुलालाची मशिनवरून उधळण सुरू होती. साडेबारा वाजता सर्व कार्यकर्ते गुलालात न्हाऊन निघाले. कडक उन्हातही तरुणांचा जोश कमी झाला नव्हता.

शर्ट काढून तरुण डीजेच्या तालावर नाचत होते. चंद्रकांत पाटील हिमालयात ध्यानधारणेसाठी बसले आहेत, असे पोस्टरही झळकावण्यात आले. पहिल्या फेरीपासून सुरू झालेला जल्लोष मताधिक्य वाढत जाईल तसा वाढतच होता. भर उन्हात बेभान होऊन 'बंटी बंटी', 'ऋतुराज ऋतुराज' या गाण्यावर तरुण नाचत होते, सोबत गुलालाची मोठ्या प्रमाणावर उधळण सुरू होती. अजिंक्यतारा पूर्ण गुलालात न्हाऊन निघाला. रेस वाढवत, पुंगळ्या काढून दुचाकी आणि ओपन टप जीपमधून जल्लोष, सोबत फटाके, असा जंगी जल्लोष केला.

दुपारी एक वाजता सतेज पाटील, ऋतुराज पाटील अजिंक्यतारावर निकालाची 17 वी फेरी पूर्ण झाली आणि निकालाचा कल स्पष्ट झाला, जयश्री जाधव यांच्या विजयाची खात्री झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील अजिंक्यतारा कार्यालयावर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी अजिंक्यताराचा परिसर दणाणून गेला. दोन्ही नेत्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
सकाळी अकरापासून महिला कार्यकर्त्या अजिंक्यतारा कार्यालयावर जमा झाल्या होत्या. फेरीच्या निकालात जयश्री जाधव यांचे लीड वाढतच होते, त्यावेळी महिला कार्यकर्त्यांत जोष निर्माण होत गेला. जयश्री जाधव यांचे 13 हजारांवर लीड झाल्यानंतर महिलांनी डीजेच्या तालावर ठेका धरून विजयाची धम्माल केली.

चंद्रकांतदादा हिमालयात फरार पोस्टर लक्षवेधी

चंद्रकांत पाटील यांना भगवी कपडे घातलेला व हिमालयात ध्यानधारणेसाठी बसले आहेत, असे पोस्टर झळकवण्यात आले होते.

logo
Pudhari News
pudhari.news