सातारा : कराड परिसरातील कॅफेमध्ये गैरप्रकार वाढले

सातारा : कराड परिसरातील कॅफेमध्ये गैरप्रकार वाढले
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड शहर व तालुक्यातील अनेक कॅफेमध्ये मिनी लॉजिंग केले असून तेथे गैरप्रकार वाढले आहेत. अशा काही कॅफेमध्ये अनेक अश्‍लील चाळे केले जात आहेत. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. यातूनच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. अशा कॅफे सेंटरच्या मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आली आहे. दरम्यान, कॅफे मालक युवती विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारमधील 13 कॅफे पोलिसांनी सील केले आहेत. कराडमधील कॅफे केव्हा बंद होणार? असा प्रश्‍नही दादा शिंगण यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड शहरामध्ये महाविद्यालये नियमितपणे चालू झाली आहेत. महाविद्यालयांच्या परिसरात विविध प्रकारची कॉफी शॉप पाहायला मिळतात. काही प्रमाणातील कॉफी शॉप हे उघडपणे चालू असतात. परंतु, काही कॉफी शॉप बंदिस्त प्रमाणात आहेत. या प्रकारच्या कॉफी शॉपमध्ये पोलिस चौकशीला गेले असता तेथे वेगळ्या प्रकारचे दृष्य त्यांना पाहिला मिळाले. कॉफी शॉपच्या आतील रूम्समध्ये प्रेमी युगुलांना भेटण्यासाठी व बसण्यासाठी स्वतंत्रपणे कप्पे करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलला पडदे बसवण्यात आलेले आहेत. आतील रूम्समध्ये लाईट पूर्णपणे बंद असतात. हे कॉफी शॉप म्हणजे एक प्रकारचे मिनी लॉजिंग तयार करण्यात आलेले आहे. तेथे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी गैरवर्तन करताना पाहिला मिळतात.

याबाबत अधिक चौकशी केली असता बहुतांशी प्रेमीयुगल अल्पवयीन असल्याचे समजते. त्यांचे वय, शिक्षण व व पुढील शिक्षण तसेच भविष्यसवरती परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक वेळा पोलिसांनी कॉफी शॉपच्या मालकांना समज दिली. परंतु त्यांच्यामध्ये फरक पडल्याचे दिसून येत नाही. मुला-मुलींना बसायला देताना मालक कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाहीत. त्यातून गैरप्रकार वाढत असल्याने अशा कॅफे मालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाद्वारे मनसे पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच कराड शहर पोलीस यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावरती मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, दादासाहेब शिंगण, कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे, नितीन महाडिक, चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मनसे पदाधिकार्‍यांच्या साक्षर्‍या आहेत.

कराड शहरासह विद्यानगर, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले मिनी लॉजिंग बंद करावेत. तसेच संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.
– दादासाहेब शिंगण,
कराड तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news