धुळे : अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांकडून आमचा मानसिक छळ ; शेतकऱ्यांची तक्रार | पुढारी

धुळे : अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांकडून आमचा मानसिक छळ ; शेतकऱ्यांची तक्रार

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा, धुळ्यातील अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी साक्रीत येवून दुध तपासणीच्या नावाखाली आमचा मानसिक छळ करत असल्याची तक्रार दुध उत्पादक शेतकरी, व्यापारी व डेअरी चालकांनी साक्री तहसीलदारांकडे केली आहे.  आमच्या जीवाचे बरेवाईट झाले तर संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवदेनातून दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दुध उत्पादक शेतकरी व साक्री तालुका दुध डेअरी संघटनेने म्हटले आहे की, धुळ्यातील अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी साक्रीत येवून दुध तपासणी करुन आमचा वारंवार मानसिक छळ करीत आहेत. आम्ही व्यापारी शेतकऱ्यांकडून दुध खरेदी करत असतो. दुष्काळाच्या स्थितीत गुरांना चारा, पाणी नसल्याने ते उपाशी मरत आहेत. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून हा छळ होत आहे. शेतकरी बांधवांना त्रास होत असल्याने साक्री तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दोन दिवसांचा संप केला आहे. खेड्यापाड्यातील शेतकरी डेअरीवर दुध विक्रीसाठी येतात. डेअरी चालक हे फॅट तपासणी करुन त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देतात. अन्न भेसळचे अधिकारी येतांना फक्त लॅक्टोस्कॅन मशीन घेवून येतात. संबंधीत मशिनद्वारे दुधात पाणी किती आहे हे समजते. पण मशीन व्यवस्थीत स्वच्छ नसेल तर एकाच दुधाच्या सॅम्पलने तीन वेगवेगळे निष्कर्ष येतात. संबंधीत अधिकाऱ्यांनी दुधाची गुणवत्ता चेक करण्यासाठी पाण्या व्यतिरिक्त रसायन, युरिया आणि हानिकारक द्रव्यांची भेसळ पडताळणीबाबत तशी साधने आणावीत.

पहाटे 3 पासून रात्री 10 वाजेपर्यंत या व्यवसायासाठी मेहनत घेत असताना अधिकाऱ्यांकडून त्रास होत आहे. तो थांबवावा अन्यथा साक्री तालुक्यात दुध विक्री पूर्णपणे बंद करु असा इशारा हरीष शेवाळे, पंकज देसले, सुमित परदेशी, नितीन सोनवणे, पंकज गवळी, हर्षल शेवाळे, मनोहर पाटील, निलेश घरटे, बाळा घरटे, अमोल गवळी, बाबू माळीच, भूषण ठाकरे, अनिल गवळी, संजय गवळी, ललीत देवरे, राकेश शिंदे, खुशाल गवळी, गोरख देवरे, सुभाष नेरकर यांनी दिला.

हेही वाचा :

Back to top button