ठाकरे, पवार यांना हिंदू संस्कृती संपवायची आहे का? : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

ठाकरे, पवार यांना हिंदू संस्कृती संपवायची आहे का? : चंद्रशेखर बावनकुळे

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना हिंदू संस्कृती संपवायची आहे का? असा सवाल करून, शरद पवार, ठाकरे यांचा बदला घ्या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिरजेतील दत्त चौकात गुरुवारी आयोजित जाहीर सभेत केले. सांगली दुष्काळमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी भाजपला निवडून दिले पाहिजे. 2024 च्या निवडणुकीत आमचे 225 आमदार निवडून येतील, असे जनसमर्थन मिळणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी कामगारमंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, युवा नेते सुशांत खाडे उपस्थित होते.

सायंकाळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मिरजेत आले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी येथील पटवर्धन हॉल येथे मिरज विधानसभा, सांगली विधानसभा व पलूस विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची वॉरियर बैठक घेतली. मार्केट परिसरातून बालगंधर्व नाट्यगृह येथे घर चलो अभियान रॅली काढण्यात आली. रात्री दत्त मैदान येथे त्यांची जाहीर सभा झाली.

ते म्हणाले, उदय निधी म्हणतात, हिंदू संस्कृती गाडून टाकू. असे बोलणारे आपल्याला मान्य आहेत का? ते तुमच्या आघाडीत आहेत. ते मान्य आहेत का? उद्घव ठाकरे व शरद पवारांनी याचे उत्तर द्यावे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून त्या दोघांनी काम केले. धर्माच्या संरक्षणासाठी एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून पुढे आले आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आणले.

संजयकाकांचे काय होणार? 2024 खाडेभाऊ काढून घ्या…

बावनकुळे म्हणाले, देशात आता 191 महिला खासदार होणार आहेत. संजयकाकांचे काय होणार हे माहीत नाही. 2029 मध्ये 100 महिला आमदार होणार आहेत. खाडेसाहेब 2024 तेवढी काढून घ्या. यावर एकच हशा पिकला

राम मंदिर बघायला न्या…

बावनकुळे म्हणाले, 500 वर्षांचा इतिहास सांगणारे आता प्रभू राम यांचे मंदिर 22 जानेवारी 2024 रोजी खुले होणार आहे. पालकमंत्री, खासदार व आमदारांनी सर्वांना राम मंदिर बघायला घेऊन जावे. महिलांना तेथे पहिले घेऊन जावा.

भाजपचे मिरजेवर उपकार : खाडे

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही कधी कमी पडलो नाही, पुढेही कमी पडणार नाही. मिरजेला मंत्रीपद देऊन भाजपने उपकार केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, आ. गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, शेखर इनामदार, सत्यजित देशमुख, डॉ. रवींद्र आरळी आदी उपस्थित होते.

मोठे पक्ष अजूनही भाजपसोबत येतील

2024 च्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे अजूनही मोठे पक्ष भाजपसोबत येतील, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मिरजेत प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. ते म्हणाले, अजितदादा सरकारसोबत आले तर ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार हे निश्चित होते. त्यात गैर काय नाही. कुणीही पालकमंत्री झाले तरी आमचे पालकमंत्री एकमेकांना सांभाळतील. अजितदादांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे आता पुण्यातील भाजपाचे कार्यकर्ते यापुढे अजितदादा संभाळतील. त्यांच्यात ती क्षमता आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्याकडे गेल्याने भाजप कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला.

Back to top button