

धुळे : पुढारी वृत्तसेवा
दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे सवर्धन होणे गरजेचे आहे. असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कावठी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले.
श्री. शि. वि. प्र. संस्थेचे माध्यमिक विद्यालय कावठी येथे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सांगितले की, वृक्षतोडीचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणाचा समतोल नसल्याने वारंवार दुष्काळ पडत आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर असे नैसर्गिक आपत्तीचे प्रकार वारंवार घडत आहेत. येणार्या काळात पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. त्यासोबतच प्रत्येकाने लावलेल्या झाडांचे संवर्धनही केले पाहिजे. वृक्षारोपणाबरोबरच शेतकरी, ग्रामस्थ व तरुणांनी पाणी अडवा पाणी जिरवाचा उपक्रम प्रत्येक गावात, शिवारात राबवावा. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचे प्रमाण वाढून शेतकरी समृध्द होण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी यावेळी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, विशेष कार्य. अधिकारी प्रकाश पाटील, काँग्रेसचे प्रबोधन समन्वयक डॉ. दत्ता परदेशी, संचालक राजेंद्र भदाणे, जि. प. सदस्य अरुण पाटील, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, संचालक संतोष राजपूत, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.