साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल

साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा : साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जयश्री हेमंत पवार यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या नगरपंचायतीमध्ये सतरा पैकी 11 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या असल्यामुळे नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदावर याच पक्षाची वर्णी लागणे निश्चित आहे. आता यासंदर्भात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत निवड जाहीर करण्यात येणार आहे.

साक्री नगर पंचायतीची निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्‍यता होती. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा पुरता धुव्वा उडाला. साक्री ग्रामपंचायत ते नगरपंचायतीवर गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर नागरे यांची एकहाती सत्ता होती. मात्र नागरिकांनी ही सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पार्टीला सतरा पैकी 11 जागांवर विजयी केले. त्यामुळे या नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदावर याच पक्षाची वर्णी लागणे निश्चित आहे.

या दरम्यान शासनातर्फे नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमातीच्या महिलेसाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे या जागेवर जयश्री हेमंत पवार व उषाबाई अनिल पवार या दोन महिला सदस्य निवडून आल्या होत्या. यापैकी जयश्री पवार यांच्या नावाला पक्षाने पसंती दिल्यामुळे त्यांनी आज नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवारची मुदत देण्यात आली होती.

मात्र पवार यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून कोणताही अर्ज दाखल झाला नसल्याने पक्षाच्यावतीने त्यांनाच पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे. उपविभागीय अधिकारी हे या सभेचे पीठासन अधिकारी राहणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अर्ध्यातासाने उपनगराध्यक्ष पदासाठीच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल. उपनगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने ज्येष्ठ सदस्य बापू गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news