नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'बार्टी'मार्फत अनुसूचित जातींच्या उमेदवारांना 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2023-24'साठी पुणे व नाशिक येथे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांपासून अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, तांत्रिक अडचणींपाठोपाठ तलाठी भरती पेपरमुळे बार्टीची चाळणी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली आहे. यामुळे आता ही परीक्षा ३ सप्टेंबरऐवजी १७ सप्टेंबरला होणार आहे.
महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षेसाठी नाशिक व पुणे येथे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणची (कोचिंग) सुविधा खासगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. दोन्ही शहरांत प्रत्येकी २०० अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तींसाठी, ५ % जागा अनुसूचित जातीअंतर्गत वंचित जातींमधील (वाल्मीकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी) विद्यार्थ्यांसाठी, तर ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवणार आहेत.
दरम्यान, बार्टीने सुरुवातीला ३० जुलैला चाळणी परीक्षा निश्चित केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलत ६ ऑगस्टला नियोजित केली होती. या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने दुसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलून २० ऑगस्टला होईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा नियोजित तारखेला परीक्षा न घेता पुढची तारीख दिली. त्यानुसार ३ सप्टेंबरला परीक्षा होणार होती. मात्र, आता तलाठी भरती पेपरचे कारण पुढे करत चौथ्यांदा परीक्षा स्थगित करून १७ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण नाशिक व पुणे येथे १२ महिने नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण मिळणार आहे. मात्र, वारंवार चाळणी परीक्षेच्या तारख्या बार्टीकडून बदलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एमपीएससीने सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कालावधी मिळण्याचे चिन्हे आहेत.
हेही वाचा :