पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी 25 लाख टनांचा साखरेचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. सणासुदीमुळे सध्या साखरेला चांगली मागणी आहे. कारखान्यांकडून साखर विक्रीस हात आखडता घेतला जात असल्यामुळे साखरेचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे. श्रावण महिन्यातील उपवास व गणपतीच्या सणाचा विचार करून केंद्राने साखरेचा मुबलक कोटा दिलेला आहे.
मागील चार महिन्यांचा विचार करता कारखान्यांकडून साखर विक्रीस हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे साखर निविदांमध्ये कमी प्रमाणात साखर विक्री होत असल्याने दर चढेच राहत आहेत. त्याचा परिणाम घाऊक बाजारात साखरेचे दर तेजीत स्थिरावण्यावर होत असल्याची माहिती घाऊक व्यापार्यांकडून मिळाली.
दरम्यान, घाऊक बाजारात बुधवारी (दि.30) एस् 30 ग्रेड साखरेचा प्रति क्विंटलचा दर 3825 ते 3850 रुपयांवर स्थिरावला आहे. तर कारखान्यांवरील साखरेच्या निविदा क्विंटलला 3550 ते 3600 रुपये दराने जात आहेत. तर किरकोळ बाजारात साखरेची प्रति किलोची विक्री 40 रुपये दराने होत आहे.
दोन दिवसांत निविदा
सप्टेंबर महिन्यातील कोट्यातील निविदाही दोन दिवसांत सुरु होतील. कारखान्यांनी कोट्यानुसार साखर विक्रीस प्राधान्य दिले तर बाजारात साखरेची मुबलक उपलब्धता राहून दर किंचित कमी होतील, असाही मतप्रवाह आहे. मात्र, पूर्वानुभव पाहता आगामी काळातही कारखाने साखर विक्रीस हात आखडताच ठेवण्याची शक्यता अधिक आहे. कारण साखर बाजारात अद्यापही सट्टेबाजांची सक्रियता कायम आहे. त्यामुळे गरजेइतकी साखर खरेदी करण्यास बाजारपेठेतून प्राधान्य दिले जात आहे. शिवाय राज्यात पुढील वर्षीही उसाची उपलब्धता कमी असल्याने साखरेचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
हेही वाचा :