आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरण : तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे गजाआड | पुढारी

आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरण : तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे गजाआड

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्श पतसंस्थेतील 202 कोटींच्या घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी प्रथमच शासकीय अधिकाऱ्याला अटक केली. 2016 ते 18 या काळातील जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊसाहेब खरे (57) यांना बुधवारी (दि. 30) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तेव्हाच्या ऑडिट रिपोर्टकडे दुर्लक्ष केल्यामुळे या घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

2016 ते 2019 या काळातील चाचणी लेखा परीक्षण अहवालात आदर्श पतसंस्थेतील बोगस कर्ज प्रकरणात तब्बल 202 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. पोलिस आयुक्त मनोज लाेहिया यांनी विशेष तपास पथक स्थापन करून या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सर्वात आधी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक झाली. दरम्यान, तत्कालिन तिन्ही ऑडिटरला जामिन मिळाल्यामुळे पोलिसांवर आरोप होऊ लागले. दोन दिवसांपूर्वी खा. इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यांदा मोर्चा काढून पोलिस व प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. ऑडिटरला जामिन मिळालाच कसा? असा प्रश्न विचारून त्यांनी पोलिसांना धारेवर धरले होते. त्यानंतर तपास पथक पुन्हा जोमाने कामाला लागले. बुधवारी (दि. 30) थेट तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक करून पोलिस कोणालाही सोडणार नाहीत, हा मेसेज दिला.

आतापर्यंत 12 आरोपींना बेड्या

आदर्श घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अध्यक्ष अंबादास मानकापे, संचालक अशोक काकडे, काकासाहेब काकडे, त्रिंबक पठाडे, रामसिंग पवार आणि नामदेव कचकुरे, सुनंदा मानकापे, वनिता मानकापे, सविता अधाने आणि संदीप पवार, सुनील मानकापे, आणि सतीश खरे, अशा १२ आरोपींना अटक केली आहे. यातील खरे हे पोलिस कोठडीत तर उर्वरित ११ जण न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. दरम्यान, वनिता आणि सुनंदा या अंबादास मानकापे यांच्या सुना असून त्यांचा न्यायालयाने जामिन फेटाळला आहे.

सतीश खरे 30 लाखांच्या लाच प्रकरणात निलंबित

नाशिक जिल्ह्यातील एका बाजार समितीत कायदेशीररित्या निवडून आलेल्या संचालकाविरुद्ध सहकार विभागात एक दावा दाखल होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजुने देण्यासाठी 15 मे रोजी तेथील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणात त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांना निलंबित केले. 20 मेपर्यंत ते एसीबीच्या कोठडीत राहिले. त्यानंतर 58 दिवस ते नाशिक रोड कारागृहात राहिले. तब्बल 64 दिवसांनंतर ते जामिनावर सुटले होते. त्यांच्या घरात 54 तोळे सोने, 16 लाख रुपये रोकड, दोन अलिशान कार असल्याचे समोर आले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत.

खरे कुटुंबियांची 20 बँक खाती

सतीश खरे हे सुरुवातीपासून वादग्रस्त अधिकारी ठरले आहेत. लाच प्रकरणानंतर नाशिक एसीबीने कसून तपास केला. त्याच्यासह कुटुंबियांची वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल 20 बँक खाती असल्याचे समोर आले होते. त्यात 43 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले होते. अनेक बँकांमध्ये लॉकर असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांचे मोठे गौडबंगाल असल्याचा संशय बळावला असून एसीबीचा अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button