नाशिक : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी नाशिक महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनपाच्या वाहनांसह सिटीलिंक बसेसच्या माध्यमातूनदेखील जनजागृती करण्यात येणार आहे.
नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणाची माहिती देणे, त्यांचे प्रबोधन करणे व त्यांचा सहभाग मिळविणे याकरिता शहरातील नियोजित ठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मनपा मिळकती असलेले जलकुंभ, उद्यानांचे कुंपण, मनपा दवाखाने, मनपा शाळा, मलनिस्सारण केंद्रे याठिकाणी प्रबोधनात्मक रंगरंगोटी करण्यात येत आहे. स्वच्छ अभियानांतर्गत दरवर्षी शासनाकडून शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येऊन निकषांच्या पूर्ततेनुसार गुणांकन प्रदान केले जातात व त्या आधारे शहरांना मानांकन प्रदान केले जाते. याच कार्यवाहीचा एक भाग म्हणून आयुक्तांच्या आदेशानुसार, नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसेसवर फलक, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.
या अंतर्गत, शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग असणे, कचरा वर्गीकरण करणे, ओला व सुका कचरा घंटागाडीत देणे, उघडयावर शौचास प्रतिबंध, स्वच्छ व साफ शौचालय, होम कंपोस्टिंग, प्रतिबंधित प्लास्टिक न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वछता न करण्याबाबत जनप्रबोधनात्मक बाबी समाविष्ट आहेत.