Ahilyanagar Municipal Election Drama: अहिल्यानगर महापालिका निवडणूक; दाम्पत्यांची एन्ट्री, बंडखोरी आणि राजकीय नाट्य

कुठे अध्यक्ष-पत्नी मैदानात, कुठे अपक्षांचा भडिमार; माघारी आणि बंडखोरीने निवडणूक रंगात
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

काँग्रेस आणि शिवसेनेचे अध्यक्ष पत्नीसह मैदानात

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व त्यांची पत्नी शीला चव्हाण आणि शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव व त्यांची पत्नी अश्विनी जाधव या दोन जोड्या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. यातील जाधव दाम्पत्य 10 नंबर वार्डातील ओपन व महिला राखीव जागेवर, तर दीप चव्हाण हे 9 नंबर आणि शीला चव्हाण वार्ड 5 च्या राखीव जागेवर निवडणूक लढवीत आहेत.

सावेडीत पक्षामुळे घराची विभागणी

सावेडीत वाखुरे यांचे घर शिवसेनेत पण शिंदे सेना आणि ठाकरे सेनेत विभागले गेले. एकाच घरात राहणाऱ्या दोन सख्ख्या जावा दोन पक्षांतून निवडणूक लढवीत आहेत. महिलेसाठी राखीव असलेल्या वार्ड नंबर 3 ब मधून नीलम विपुल वाखुरे या ठाकरे सेनेकडून तर याच वार्डातील (3 क) महिलेसाठी राखीव दुसऱ्या जागेवर शिवसेनेकडून स्वप्नजा विनय वाखुरे या दोन्ही जावा नशीब आजमावत आहेत.

चौघा अधिकृतांच्या माघारीने शिवसेना, मविआला धक्का

काँग्रेस, ठाकरे सेना व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रभाग 11 ड मधील ठाकरे सेनेचे कल्पेश अमरसिंग परदेशी, केडगावच्या वॉर्ड 15 मधून राष्ट्रवादीचे मनोज भाऊसाहेब कराळे आणि वार्ड सहामधून राष्ट्रवादीच्या सविता विवेक गायकवाड यांनी अचानक माघार घेतली. वॉर्ड सातमधून शिवसेनेच्या श्रद्धा रवींद्र वाकळे यांनीही माघार घेतली. या पक्षांना हा धक्का मानला जात आहे.

छिंदमची हत्तीची चाल; चौघांचा ‌‘बसपा‌’ पॅनल

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद शंकर छिंदमने यंदा बसपाच्या हत्तीची चाल खेळली आहे. प्रभाग 10 मध्ये तीन उमेदवार देत छिंदमने निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. छिंदमने बसपाकडून चौघांचा पॅनल केला होता, मात्र यातील पूजा विकी इंगळे यांनी अचानक माघार घेतल्याने छिंदमचा पॅनल लंगडा झाला. छिंदमच्या पॅनलमधील मुदस्सर शेख हे माजी नगरसेवक आहेत. गतवेळी माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी बसपाचा प्रयोग करत निवडून आले होते. पुढे सचिन जाधव शिवसेनेत गेले आणि आता शहरप्रमुख आहेत. मुदस्सर शेख यांनी हत्तीवर स्वार होत याच सचिन जाधव यांच्याविरुद्ध लढाई पुकारली आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Tisgaon Traffic Jam: तिसगाव आठवडे बाजारामुळे पाच तास वाहतूक ठप्प

त्रागा केला पण निष्ठावंतांनी दाखविली अढळ निष्ठा...

प्रभाग 2, 3, 6, 7 अशा विविध प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षांनी अन्य उमेदवाराला संधी दिल्याने निष्ठावंत एबी फॉर्म मिळाले नाहीत. निष्ठावंत नाराज झाले, त्यांनी त्रागा केला. परंतु, आज अर्ज माघारी वेळी कोणाच्याही फोनची न वाट पाहता निष्ठावंतांनी पक्षावर निष्ठा ठेवून अर्ज माघारी घेतले.

मुकुंदनगरात चौरंगी लढत; गाडेंचा एकलव्य प्रयोग

मुकुंदनगरमधील प्रभाग चारमध्ये चौरंगी लढत होत आहे. एमआयएम, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसोबतच एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी असा चौरंगी सामना तेथे रंगणार आहे. माजी सभापती संजय गाडे यांनी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा प्रयोग करत गाडे कुटुंबातील दोघांना रिंगणात उतरविले आहे. मीर असीफ सुलतान यांनी समाजवादी तर माजी नगरसेवक समदखान यांनी एमआयएमचे नेतृत्व करत आहेत. काँग्रसने चौघांना उमेदवारी देत मुकुंदनगरच्या प्रभागात रंगत वाढविली आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Nighoj Liquor Ban Activists: निघोज दारूबंदी समितीच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून घेतली प्रचारफेरी

शिवसेनेचे फॉर्म बाद झाल्यानंतर कोतकर, खामकर अपक्ष

शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर छाननीत एबी फॉर्म बाद झाल्याने केडगावातून हर्षवर्धन कोतकर आणि सावेडीतून अमित खामकर यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली आहे. हर्षवर्धन कोतकर तर 16 आणि 17 अशा दोन प्रभागांतून अपक्ष उमेदवार आहेत. अमित खामकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली, पण त्यांचा पक्षाचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.

केडगावातील ‌‘ते‌’ समर्थक अखेर अपक्ष म्हणूनच मैदानात

पक्ष कोणता हे ठरण्याअगोदरच केडगावातील ‌‘ते‌’ समर्थक प्रचाराला लागले. मात्र अचानकच्या निर्णयाने त्यांची कोंडी झाली. पण पुढचे टाकलेले पाऊल त्यांना मागे घेणे अशक्य झाले. त्यामुळे ‌‘ते‌’ अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. आमच्या नेत्याने केडगावकरांना कोथरूडचे जे स्वप्न दाखवले होते, ते पूर्ण करण्यासाठी, तसेच केडगावकरांच्या स्वाभिमानासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ठामपणे निर्णय घेतला आहे. केडगावकरांसाठी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा सागर सातपुते यांनी केली आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Shrirampur Police Liquor Raid: श्रीरामपूर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; 1.89 लाखांचा गावठी दारूचा साठा नष्ट

भाजपचे मनेष साठे आणि सोनाली चितळेची बंडखोरी

माजी नगरसेविका सोनाली अजय चितळे यांनी प्रभाग 11 तर मनेष साठे यांनी प्रभाग 13 मध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. हे दोघेही भाजपचे माजी नगरसेवक आहेत. दोघांनाही याच प्रभागातून पक्षाकडून उमेदवारी हवी होती. राष्ट्रवादी-भाजप युतीतील जागा वाटपात या दोघांच्याही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेल्याने तेथे दोघांनाही भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी माघारीचा निरोप भाजपकडून दोघांनाही देण्यात आला, मात्र दोघांनी पक्षादेश धुडकावून लावत बंडखोरी केली.

मनसेसह विविध अपक्ष उमेदवार देवदर्शनाला

महापालिका निवडणुकीच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर अनेक अपक्ष उमेदवार देवदर्शनासाठी निघून गेले. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या उमेदवारांचा समावेश असल्याचे बोलले जाते. मनसेने तशी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. दुसरीकडे त्यांच्या शोधासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी कार्यकर्ते मागावर पाठविले होते. मात्र, अर्ज माघारीचे दोन दिवस संपले तरी त्यांचे देवदर्शन उरकले नाही. त्यामुळे अनेकांच्या बिनविरोध होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news