

नगर: जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचारी पडताळणीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. पहिल्या यादीतील 203 कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयाने (सिव्हील हॉस्पिटल) पत्र देऊन तपासणीसाठी बोलावले होते. मात्र, यातील 33 कर्मचाऱ्यांनी तपासणीकडे पाठ फिरवल्याचे दिसले. यामध्ये शिक्षण विभागातील 32 कर्मचारी आहेत. दरम्यान, सीईओंनी आता दुसरी यादी सिव्हीलला दिली असून, त्यामध्ये सर्वच विभागांतील 396 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये केसपेपर, आवक, जावक यांची खातरजमा केली जाणार असल्याने, दिव्यांग पडताळणी आणि त्याच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे सीईओ आनंद भंडारी यांनी याबाबत गंभीर दखल घेताना शासनाच्या मार्गदर्शनानुसार आणि दिव्यांग विभागाच्या संचालकांच्या सूचनांनुसार दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग़त्व तपासणीबाबत निर्णय घेतला आहे. आरोग्य उपसंचालक विभागाशी समन्यव साधण्यात येत आहे.
तालुकास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण विभागातील 179 कर्मचाऱ्यांची दिव्यांग पडताळणी करण्यासाठी यादी पाठविण्यात आली होती. मात्र, यापैकी 147 कर्मचाऱ्यांनी हजर होऊन, तपासणी करून घेतली. तर 32 कर्मचारी तपासणीकडे फिरकलेच नाहीत. तसेच इतर विभागाच्या 24 कर्मचाऱ्यांची यादी सिव्हीला मिळाली होती. त्यातील 23 जण तपासणीसाठी हजर राहिले, तर एक कर्मचारी आला नाही. अशाप्रकारे पत्र देऊनही 33 जणांना कर्मचारी तपासणीसाठी हजर राहिलेले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीसह अन्य सवलतींचा लाभ घेणाऱ्या 98 कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी करून ते खरोखर दिव्यांग आहेत का, त्यांच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी किती आहे, याची पडताळणीबाबत दि. 27 डिसेंबरला जिल्हा रुग्णालयाला तिसरी यादी मिळाल्याचे समजते.
कर्णबधीर, अल्पदृष्टी तपासणी प्रलंबित
कर्णबधीर आणि अल्पदृष्टी प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या 142 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद आहे. संबंधितांची यादी आरोग्य उपसंचालक़ांकडे पाठविण्यात आली आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून या यादीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही समजले.
‘त्या’ 105 कर्मचाऱ्यांची कोर्टात धाव
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांची दिव्यांग पडताळणीचा निर्णय झालेला असताना 105 कर्मचाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतरच त्यांच्याबाबत निर्णय होणार आहे.
जिल्हा परिषदेकडून पुन्हा दोन याद्या आल्या आहेत. यामध्ये 396 कर्मचाऱ्यांची पुनश्च पडताळणीचे निर्देश आहेत, तर 98 कर्मचाऱ्यांचीही दुसरी स्वतंत्र यादी आली आहे. प्रमाणपत्रांसह त्यांच्या दिव्यांगत्वाचीही पडताळणी होईल. संंबंधित कर्मचाऱ्यांना तारखा देऊन बोलावले जाईल.
डॉ. संजय घोगरे जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हील