

श्रीगोंदा: आढळगाव जिल्हा परिषद शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेला आनंदी बाजार उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विक्रीस ठेवलेल्या वस्तूतून जवळपास एक लाख रुपयांची उलाढाल झाली.
आढळगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी बाजार भरविण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच शिवप्रसाद उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, उपसरपंच अनुराधा ठवाळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गाढवे, उपाध्यक्षा सोनाली गव्हाणे, रुपाली वाकडे, प्रिया बोत्रे, दीपक बोत्रे, अमोल डाळिंबे, शाम भालेराव, अजय काळे, डॉ. कुमुदिनी शिंदे, अंजली चव्हाण, अंकुश गांगर्डे, हिराबाई गांगर्डे ,सुजाता वाकडे, गणेश काळे, दत्ता खताळ आदी उपस्थित होते
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजवणे, व्यवहारज्ञान वाढवणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे विशेषतः व्हेज पुलाव, वडापाव, समोसे, ढोकळा, लाडू, अशा खाद्यपदार्थांची रेलचेल होती.
त्याचबरोबर शोभेच्या व उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स लावले होते. खरेदी-विक्री करताना विद्यार्थ्यांनी फायदा-तोटा, हिशेब ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य प्रभावीपणे दाखवून दिले. सरपंच शिवप्रसाद उबाळे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकसित होते. अनिल ठवाळ म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण भागाचा मुख्य पाया आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. जगाचे ज्ञान त्यांना होणे गरजेचे आहे. शरद जमदाडे म्हणाले की, आज भरविण्यात आलेला आनंदी बाजार एक वेगळा उपक्रम आहे. पुस्तकापलीकडे जाऊन व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक उत्तरेश्वर मोहळकर, शिंदे, वाकडे, वाकडे, पवार, शिंदे यांनी परिश्रम घेतले.